मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – भारतीय रसिक प्रेक्षकांना चित्रपटाची खूपच आवड आहे त्यामुळे त्यांना कोणता चित्रपट आवडतो हे सांगता येत नाही, त्यांनी एखादा चित्रपट डोक्यावर घेतला आणि त्या चित्रपटाला प्रचंड प्रमाणात पसंती मिळाल्यावर तो अनेक विक्रम मोडीत काढत असतो, असा आजवरचा अनुभव आहे. सध्या गाजत असलेल्या पुष्पा या चित्रपटाविषयी देखील असेच म्हणता येईल. दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या पुष्पा द राइज या चित्रपटाने रिलीज होऊन केवळ सुमारे दोन महिने झाले असून या कमी वेळेत एक विक्रम केला आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित झाला होता, मात्र असे असूनही चित्रपटाची जादू कमी होताना दिसत नाही. रिलीजसोबतच चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम मोडत आणखी एक टप्पा गाठला आहे.
पुष्पा द राइज या चित्रपटाने 9 आठवड्यात 1.39 कोटींची कमाई केली आहे. या यशासह, पुष्पा हा चित्रपट 9व्या आठवड्यात इतकी कमाई करणारा देशातील दुसरा चित्रपट ठरला आहे. याआधी, विकी कौशलचा चित्रपट उरी द सर्जिकल स्ट्राइक 1.64 कोटी रुपयांसह पहिल्या स्थानावर होता. दरम्यान, पुष्पानेही या यादीत आपले दुसरे स्थान निश्चित केले आहे. चित्रपटाच्या कलेक्शनबद्दलही सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे, कारण चित्रपटाने ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊनही ही कामगिरी केली आहे. मात्र, आता मंदगतीने सुरू झालेला पुष्पाचा व्यवसाय येत्या आठवडाभरात आणखी कमी होईल, असा अंदाज आहे.
विशेष म्हणजे या चित्रपटाने कमी कालावधीत अनेक विक्रम केले आहेत. बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडीत काढत या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने 100 कोटींच्या क्लबमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. या चित्रपटाने आधीच जगभरात 300 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. चित्रपटाची लोकप्रियता पाहून निर्मात्यांनी आता चित्रपटगृहांनंतर OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर हा चित्रपट प्रदर्शित केला आहे. पुष्पा चित्रपटाबद्दल सांगायचे तर अल्लू अर्जुनचा हा ब्लॉकस्टर चित्रपट दि. 17 डिसेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. अल्लू अर्जुन व्यतिरिक्त या चित्रपटात साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल देखील मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे.