इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘पुष्पा २’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘पुष्पा’ चित्रपटाला देखील छाट्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. काही दिवसांपूर्वीच ‘पुष्पा २’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. त्या टिझरला प्रेक्षकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. आता प्रेक्षक हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत. मात्र, नुकतीच पुष्पा २ या चित्रपटाबद्दल एक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘पुष्पा २’ चे कलाकार ज्या बसमध्ये प्रवास करत होते त्या बसला अपघात झाला आहे, त्यामध्ये दोन कलाकार जखमी झाले आहेत.
शूटिंगवरून परतत असताना अपघात
‘पुष्पा २’ चे कलाकार आंध्र प्रदेशात शूटिंग करत होते. तेथून हैदराबादला परतत असताना तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्यात बुधवारी बसला अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कलाकारांना घेऊन जाणाऱ्या या बसने हैदराबाद – विजयवाडा महामार्गावर नरकटपल्लीजवळ थांबलेल्या आरटीसी बसला धडक दिली. या अपघातात दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.
बस चालकाची चूक
या अपघातात बस चालकाची चूक असल्याचे समोर आले आहे. गाडीत काही तांत्रिक बिघाड झाल्याने आरटीसी बस चालकाने बस रस्त्याच्या कडेला थांबवली होती. कलाकारांना घेऊन जाणार्या बसच्या चालकाचे आरटीसी बसकडे लक्ष गेले नाही. त्यामुळे ‘पुष्पा २’च्या बसची आरटीसी बसला धडक लागली. या घटनेत दोन कलाकार गंभीर जखमी झाले. जखमी कलाकारांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अल्लू अर्जुन स्वतःच्या गाडीत
‘पुष्पा २’ च्या कलाकारांच्या बसला अपघात झाल्याचे कळताच चाहत्यांना अल्लू अर्जुनची काळजी वाटली. मात्र, अल्लू अर्जुन या बसमध्ये नव्हता. हे कळताच चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. अल्लू अर्जुन हा अपघाताच्या वेळी बसमध्ये नव्हता तर त्याच्या कारमध्ये होता. यामुळेच तो या अपघातातून बचावला.
चित्रपटासाठी करावी लागणार प्रतीक्षा
अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना ‘पुष्पा-द रुल’साठी अजून थोडी वाट पहावी लागेल. २०२४ पूर्वी हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होणार नसल्याची चर्चा आहे. चित्रपटातील काही प्रसंगांचे चित्रीकरण अजूनही बाकी आहेत. अलीकडेच या चित्रपटासाठी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहशी चर्चा करण्यात आल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र अद्याप यासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
Pushpa 2 Movie Team Vehicle Accident