नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुष्पा २ हा चित्रपट बघण्यासाठी सिनेमागृहात जाणे एका कुटूंबियास चांगलेच महागात पडले आहे. पुढे बसलेल्या मुलाला पाय लागल्याच्या कारणातून टोळक्याने नातेवाईकांना बेदम मारहाण केली असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहित संजय सिंगवी (२६ रा.शिवाजीनगर दिंडोरी) या युवकाने याबाबत फिर्याद दिली आहे.
सिंगवी बुधवारी (दि.११) रात्री काका विनोद जैन, हेमंत जैन, मित्र अमोल आगळे, प्रतिक साळुंके, बहिण रिध्दी सिंगवी, भाऊ प्रिन्स सिंगवी आदीना सोबत घेवून पुष्पा २ हा नामांकित चित्रपट बघण्यासाठी कॉलेजरोड भागात गेले होते. बिगबाजार येथील स्मार्ट बाजार या सिनेमागृहात बघत असताना पुढील आसनावर बसलेल्या मुलाला पाय लागल्याने ही घटना घडली. मध्यरात्री चित्रपट संपल्यानंतर सर्व नातेवाईक पार्क केलेल्या आपल्या वाहनांच्या दिशेने पायी जात असतांना आठ ते दहा जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला.
लाथाबुक्यांसह थेट दगड विका व काचेच्या बाटल्या फेकून मारण्यात आल्याने मोहित सिंगवीसह त्याचे मित्र आणि नातेवाईक जखमी झाले असून या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी धाव घेत तात्काळ चार जणांना अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक काळे करीत आहेत.