नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक शहर आणि विशेषतः रामतीर्थ,पंचवटी परिसराच्या विकासात पुरोहित संघाचे योगदान मोलाचे असून या संघाला विश्वासात घेऊनच कुंभमेळ्याचे नियोजन केले जाईल,असे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी केले.
श्रीगंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी आणि संघटक धनंजय बेळे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली त्यावेळी खत्री बोलत होत्या, पुरोहित संघाच्या नूतन कार्यकारणीचे मनिषा खत्री यांनी मनापासून स्वागत केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तीर्थावर तसेच कुंभमेळा काळात येणाऱ्या भाविकांसाठी चांगल्या सुविधा कशा देता येतील, त्याचे नियोजन कसे करता येईल व गोदावरी प्रेमींना ते कसे सुखावह ठरेल,कुंभमेळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील याचीही बैठकीत विस्तृत चर्चा झाली.मनिषा खत्री यांनी पुरोहित संघाच्या सदस्यांच्या सूचना जाणून घेऊन त्याचा योग्य आदर बाळगला जाईल,असे आश्वासन दिले.
कुंभमेळा काळात रामकुंड आणि आजूबाजूच्या परिसरात भाविकांची मोठी गर्दी होते त्यामुळे हा परिसर स्वच्छ तसेच सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी पुरोहित संघाचीही आहे असे सांगून आयुक्तांनी यावेळी रामकालपथाचे सादरीकरण केले. केंद्र सरकारच्या मदतीने नाशिक महानगरपालिकेच्या समन्वयाने होत असलेल्या या नाशिक साठी अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे विस्तृत विवेचन करताना रामतीर्थाचा बदलणारा चेहरा मोहरा व संपूर्ण पुरोहितांसाठी व रोजच्या येणाऱ्या भाविकांसाठी तसेच क्रिया कर्मासाठी येणाऱ्या यजमानांसाठी भविष्यात कोण कोणत्या सुविधा कशा पद्धतीने केल्या जाणार आहे याबाबतचे विस्तृत विवेचन खत्री मॅडम यांनी केले व यामधील अनेक बाबींवर पुरोहित संघाच्या पदाधिकाऱ्यांनी समर्पक सूचना देत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रामतीर्थाचा चेहरा मोहरा बदलणारा ठरेल अशी खात्री व्यक्त केली, यामुळे रामतीर्थ व संपूर्ण गोदाकाठी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल याबाबत पुरोहित संघाचे अध्यक्ष पंचाक्षरी यांनी आशा व्यक्त करीत महानगरपालिकेचे मनःपूर्वक अभिनंदन केले असता खत्री मॅडम यांनी आपल्या भावनात्मक सूचनांचा महापालिका नक्कीच सकारात्मक विचार करेल व पुरोहित संघा बरोबर सातत्याने समन्वयाची भूमिका ठेवेल असेही खत्री पुढे म्हणाल्या.
बैठकीस उपाध्यक्ष वेदमूर्ती शेखर शुक्ल,नितीन पाराशरे व निखिल देव, कोषाध्यक्ष वैभव क्षेमकल्याणी, सचिव वैभव दीक्षित, हरीश आंबेकर,चैतन्य गायधनी,अमित पंचभैये,अमित गायधनी,सदानंद देव, राहुल अगस्ते,उपेंद्र देव,सौरभ गायधनी,मंदार देव,माणिक शिंगणे आदी पदाधिकारी तसेच महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.