इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पुरी येथील भगवान जगन्नाथाचे रत्न भंडार उघडण्याची तयारी सुरू झाली आहे. पुढील वर्षी रथयात्रेच्या आधी होणाऱ्या दुरुस्तीच्या वेळी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला रत्न भंडार उघडण्याच्या संदर्भातील परवानगी द्यावी, यासंबंधातील शिफारस पत्रही सरकारला देण्यात आले आहे.
खरे तर पुरी येथील जगन्नाथ मंदिरातील रत्न भंडाराविषयी लोकांमध्ये कमालीचे आकर्षण आहे. लाखो लोक वर्षभर दर्शनासाठी येताना याठिकाणी दागिणे दान करतात. गेल्या अनेक वर्षांपासून कोट्यवधी भाविकांच्या रत्नांनी हे भंडार भरलेले आहे. मात्र ते उघडण्याच्या संदर्भात जेव्हा जेव्हा कुणी आवाज उठवला, तेव्हा तेव्हा त्याला विरोध झाला आहे. यावेळी मात्र स्वतः मंदिर प्रशासनानेच पुढाकार घेतला आहे. पुढील रथयात्रेच्या वेळी एएसआयला रत्न भंडाराची पाहणी करण्याची परवानगी देण्यात यावी, असे शिफारस पत्र समितीनेच ओडिशा सरकारला दिले आहे. यासाठी एक तांत्रिक समिती स्थापन करण्यात येईल. यात व्यवस्थापकीय समिती व सेवकांचाही समावेश असेल. रत्न भंडाराच्या स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी आधुनिक सर्वेक्षण पद्धती वापरण्यात येण्याची शक्यताही आहे. एएसआयने एसजेटीच्या मुख्य प्रशासकांना पत्र लिहून रत्न भंडाराची पाहणी करण्यासंदर्भात सुचविले होते. रथयात्रेच्या वेळी जगन्नाथ गुंडीचा मंदिरात नऊ दिवसांच्या मुक्कामावर असताना भंडाराची पाहणी करावी, असे या पत्रात म्हटले होते.
स्वामी नाराज?
रत्न भंडार उघडण्याच्या निर्णयावर पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात ना मंदिर समितीने ना सेवकांनी ना सरकारने माझ्यासोबत संपर्क साधला, त्यामुळे यावर मला काहीही बोलायचे नाही, असे सांगत त्यांनी नाराजी स्पष्ट केली आहे. मला व्यवस्थापकीय समितीकडून कुठल्याही प्रकारची माहिती मिळालेली नाही, त्यामुळे सर्व बाबी जाणून घेतल्याशिवाय बोलणे शक्य होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
Puri bhagvan Temple Ratna Bhandar Shankaracharya Lord Jagannath
Swami Nishchalanand