नवी दिल्ली – भारतातील एका राज्याच्या एका शहरातील वृद्धाश्रमात तयार होणाऱ्या तुपाने साऱ्या जगाला वेड लावले आहे. भारतासह अमेरिका, दुबई, हॉंगकॉंग, सिंगापूर याठिकाणी या तुपाला जोरदार मागणी आहे. ‘अनादी’ असे या तुपाच्या ब्रांडचे नाव असून वृद्धाश्रमातील महिलांच्या परीश्रमातून तयाची निर्मिती होत आहे, हे विशेष.
फरिदाबाद येथील वृद्धाश्रमात या वृद्ध महिला गायींची सेवा करतात, दूध काढतात, त्यांची काळजी घेतात आणि त्यानंतर विशेष पद्धतिने तूप तयार करतात. या तुपाची किंमत २ हजार ६४० रुपये प्रति लिटर आहे, हे महत्त्वाचे. बेलाच्या पानांसोबत मातीच्या हांड्यात तयार होणारे हे तुप आता साऱ्या जगासाठी कुतुहलाचा विषय ठरत आहे.
अनादी सेवा प्रकल्प वृद्धाजमाचे संचालक प्रणव शुक्ला सांगतात की, गोधाममध्ये गीर, साहिवाल आणि डांगी प्रजातीच्या ३५ गायी आहेत. त्या दररोज ३०० लीटर दूध देतात. महिन्याच जवळपास ९००० लिटर दूध मिळते. आसपासच्या परिसरातील लोक ७० रुपये प्रतिलिटरने हे दूध खरेदी करतात. त्यातील सहा हजार लिटर दुधातून जवळपास ३०० लिटर देशी तुप तयार केले जाते. या आश्रमात ३७ ज्येष्ठ नागरिक आहेत, यात २१ महिलांचा समावेश आहे.
सोमवार आणि गुरुवारी पाच महिला चुलीवर दुधातून तुप तयार करण्याच्या प्रक्रियेत झोकून देतात. या तुपाची चव वेगळी ठेवण्यासाठी त्यात बेलाची पाने सुद्धा टाकली जातात. गायीच्या आहारात कडुलिंबाची पाने, चुना आदींचे मिश्रण ठेवले जाते. गव्हाचे दाणे, चन्याची डाळ, जव, मका खायला दिला जातो. आक्टोबर ते मार्चपर्यंत हळद देखील खायला दिली जाते.