मुंबई – दूरसंचार विभागाने मंगळवारी नव्या ऑनलाइन मोबाईल कनेक्शनसाठी नवा आदेश प्रसिद्ध केला आहे. ग्राहकांना आता घरबसल्या नवे मोबाईल सिम मागवता येणार आहेत. त्यासाठी ग्राहकांना आधार किंवा डिजिलॉकरच्या कागदपत्रांशी पडताळणी करावी लागेल. केंद्रीय मंत्रिमंडळाने १५ सप्टेंबरला घेतलेल्या निर्णयानंतर दूरसंचार विभागाने आदेशित केले आहे.
नव्या आदेशानंतर फक्त एक रुपया देऊन UIDAI आधार बेस्ड e-KYC सेवेद्वारे प्रमाणित करून नवे सिमकार्ड घरबसल्या मागवता येईल. केंद्र सरकारने जुलै २०१९ मध्ये इंडियन टेलिग्राफ अॅक्ट १८८५ मध्ये संशोधन केले आहे. त्याद्वारे मोबाईल कनेक्शनचे e-KYC जारी केले जाऊ शकणार आहे. दूरसंचार विभागाने ही प्रक्रिया सुरू केली आहे. तर प्रीपेडमधून पोस्टपेड आणि पोस्टपेडमधून प्रीपेड सुविधा घेण्यासाठी वन टाइम पासवर्ट (ओटीपी) आधारावरील प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली आहे.
सेल्फ केवायसी प्रक्रिया
सेवा देणार्या अॅप, पोर्टल किंवा संकेतस्थळावर ग्राहकांना कुटुंबीय किंवा मित्राच्या क्रमांकावरून नोंदणी करावी लागेल. त्यानंतर ओटीपीच्या माध्यमातून नोंदणीची पडताळणी केली जाईल. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक सत्यापित कागदपत्रांची आवश्यकता भासेल. डिजिलॉकरची संपूर्ण माहिती स्वयंचलितरित्या वापरता येऊ शकेल. ग्राहकाला एक स्वच्छ फोटो आणि व्हिडिओ अपलोड करावा लागेल. शहराबाहेरील ग्राहकांना स्थानिक नातेवाईकाची माहिती आणि मोबाईल नंबर द्यावा लागेल. त्या नंबरवर ओटीपी पाठवून कन्फर्म केले जाईल. त्यानंतर तुमच्या स्थानिक पत्त्यावर सिमकार्ड पाठविले जाईल.
प्रीपेडवरून पोस्टपेड
सिमकार्ड प्रीपेडवरून पोस्टपेड किंवा पोस्टपेडवरून प्रीपेड असे स्थलांतरित करायचे असेल तर तुम्हाला मोबाईल नंबरवरून एसएमएस, आयव्हीआरएस, संकेतस्थळ आणि अधिकृत अॅपवरून विनंती पाठवावी लागेल. त्यानंतर मोबाईल नंबरवर एक युनिक ट्रँझॅक्शन आयडी आणि ओटीपी मेसेज येईल. त्यानंतर प्रीपेडवरून पोस्टपेडमध्ये स्थलांतरित केल्याचा कन्फर्म मेसेज येईल. ग्राहकांना त्यानंतर e-KYC ची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यानंतरच्या ९० दिवसात ग्राहकांचे सिमकार्ड प्रीपेडवरून पोस्टपेड आणि पोस्टपेडवरून प्रीपेड होऊ शकणार आहे.
e-KYC प्रक्रिया
जर तुम्ही स्वतः e-KYC ची प्रक्रिया पूर्ण करू शकले नाही. तर डिलर किंवा एजंट तुमच्या घरी भेट देतील. त्यानंतर घरीबसल्या e-KYC ची प्रक्रिया पूर्ण करतील. त्यासाठी ग्राहकांना कोणतेही कागदपत्रे जमा करावी लागणार नाहीत. सर्व काम डिजिटली होईल. डिलर किंवा एजंट तुमचा लाइव्ह फोटो दिवस आणि वेळेनुसार क्लिक करतील आणि डिजिटली अपलोड करतील.