नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोणत्याही राज्यात सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख पदावर किंबहुना मुख्यमंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीची त्या पदावरून हाकालपट्टी करणे असो की राजीनामा घेणे असो, ही निश्चितच दुर्दैवी घटना म्हणता येईल. त्यामुळे त्या व्यक्तीला राग येणे सहाजिक आहे. परंतु लगेच तातडीने पक्ष सोडून दुसरा पक्ष स्थापन करून निवडणुका लढविणे ही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे लगेचच आपण जनतेचा विश्वास जिंकू शकू ! एवढी ताकद त्या व्यक्तीमध्ये असावी लागते. तरच ती व्यक्ती राजकारणात टिकू शकते, मात्र बरेचदा असे घडू शकत नाही. पंजाबमधील काँग्रेसच्या सत्तांतर नाट्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या संदर्भात देखील असेच घडून आले, पंजाब मध्ये आम आदमी पार्टीने काँग्रेस सद विरोधकांचा सफाया केला असताना काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन नवा पक्ष स्थापन करणाऱ्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांची नौका देखील या आमच्या लाटेत टिकू शकली नाही, किंबहुना ती बुडाली ! असेच म्हणावे लागेल. पंजाबमध्ये काँग्रेसमधून बाहेर पडलेले माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे. बुडती बोट म्हटल्या जाणाऱ्या काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या अमरिंदर सिंग यांना स्वतःची बोटही वाचवता आलेली नाही. यावेळी पंजाब विधानसभा निवडणुकीत कॅप्टन अमरिंदर सिंग पटियाला अर्बन मतदारसंघातून रिंगणात होते.
आम आदमी पक्षाचे उमेदवार अजित पटेल सिंह कोहलीला पटियालामध्ये अमरिंदर यांच्यासमोर दणणीत विजय मिळाला आहे. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्याशी मतभेद झाल्यामुळे कॅप्टन अमरिंदर यांनी गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. सुमारे महिनाभर काँग्रेसविरोधात बंडखोरी दाखवल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना राजीनामा पत्र पाठवले. राजकीय संघर्षानंतर अमरिंदर यांनी सप्टेंबरमध्ये पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेस पक्षाने चरणजीत सिंह चन्नी यांना पंजाबचे मुख्यमंत्री केले. काँग्रेस सोडल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ‘पंजाब लोक काँग्रेस’ या नव्या पक्षाची घोषणा केली. यानंतर अमरिंदर सिंग यांनी भाजपशी हातमिळवणी केली. राज्यात भाजपला सुखदेवसिंग धिंडसा यांच्या शिरोमणी अकाली दल (संयुक्त)चाही पाठिंबा मिळाला आहे.
पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने (आप) विरोधकाची सफाई केली आहे. पंजाबमध्ये यावेळी भगवंत मान यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडमध्ये राज्यातील 117 जागांपैकी सत्ताधारी पक्ष काँग्रेस केवळ 17 जागांवर आघाडीवर आहे. तर आम आदमी पक्ष 91 जागांवर आघाडीवर आहे. त्याचवेळी अकाली दल इतर 6 जागांवर आघाडीवर आहे. पंजाबमध्ये काँग्रेस सत्तेपासून दूर जात आहे आणि आम आदमी पार्टी सरकार स्थापन करणार आहे, असे आतापर्यंत आलेल्या निकालांवरून स्पष्ट झाले आहे.