चंदीगड – पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह पाचवीला पुजलेला आहे की काय अशी शंका येत आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग-नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात सुरू झालेला संघर्ष आता अरुसा आलमपर्यंत पोहोचला आहे. कॅप्टन यांची पाकिस्तानी मैत्रीण आरुसा आलम हिचे पाकिस्तानी संघटना आयएसआयशी संबंध असल्याचा आरोप आता करण्यात आला आहे. आणि त्याच्या चौकशीचे आदेश गृहमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा यांनी दिले. त्यानंतर संतप्त झालेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी एकामागे एक ट्विट करून रंधावा यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पंजाबच्या पोलिस महासंचालकांना निराधार गोष्टींच्या चौकशीसाठी लावण्यात आले आहे, असे सांगत कॅप्टन यांनी रंधावा यांच्या कार्यशैलीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
कॅप्टन यांनी केलेल्या ट्विटमध्ये रंधावा यांना विचारले की, तुम्ही माझ्या कॅबिनेटमध्ये मंत्री होता. तुम्ही कधी अरुसा आलम यांच्याबद्दल तक्रार ऐकली नाही. त्या १६ वर्षांपासून केंद्र सरकारच्या मंजुरीनंतरच त्या भारतात येत होत्या. आता एनडीए आणि यूपीए या दोन्ही सरकारांनी पाकिस्तानच्या आयएसआयसोबत मिलीभगत केली होती असे तुम्हाला म्हणायचे आहे का? दुसर्या ट्विटमध्ये कॅप्टन सांगतात, सणासुदीचे दिवस आहेत, या पार्श्वभूमीवर दहशतवाचा धोकाही वाढला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था काय राखण्यावर लक्ष केंद्रीत करणे अपेक्षित असताना तुम्ही पोलिस महासंचालकांना एका तथ्यहीन गोष्टीच्या चौकशीत गुंतवले आहे.
तिसर्या ट्विटमध्ये रंधावा यांना उद्देशून म्हटले की, आता तुम्ही वैयक्तिक हल्ले करत आहात. एका महिन्यानंतर तुम्ही आता नागरिकांना हे यश दाखवणार आहात का? ड्रग्जच्या प्रकरणाबद्दल तुम्ही दिलेल्या मोठ्या आश्वासनांचे काय झाले? तुमच्या आश्वासनांची पूर्तता कधी होते याची पंजाबमधील नागरिक वाट पाहात आहेत.
वादाचे कारण काय?
माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी अरुसा आलमच्या संबंधाबाबत तसेच आरुसा यांचे आयएसआयशी असलेल्या संबंधाबाबत चौकशी करण्याचे पंजाब सरकारने आदेश दिले. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री सुखजिंदर रंधावा यांनी जालंधर येथे चौकशीची घोषणा केली होती.
रंधावा यांचे तर्क
चार-पाच वर्षांपासून पाकिस्तानमधून येणाऱ्या ड्रोनचा मुद्दा कॅप्टन उपस्थित करत आहेत. तसेच आयएसआयपासून पंजाबला धोका आहे हे पुन्हा पुन्हा सांगत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्या पाकिस्तानी मैत्रिणीचे आयएसआयशी संबंध आहेत का याची चौकशी करणार आहोत. कोणत्या तथ्याच्या आधारावर कॅप्टन आयएसआयच्या धोक्याबाबत सांगत आहेत, त्यांच्याकडे यासंदर्भात काय माहिती आहे, याची चौकशी करणार आहोत, असे रंधावा यांनी सांगितले.