चंदीगड – सध्या पंजाब मधील राजकारण ढवळून निघाले आहे. कारण सुमारे महिनाभरापूर्वी काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी वाद झाल्याने पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणारे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राज्यात होणाऱ्या पुढील निवडणुकांसाठी तयारी सुरु केली आहे. अमरिंदर लवकरच आपला नवा पक्ष स्थापन करणार असून पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसह अकालीपासून विभक्त समविचारी गटांसोबत युती करणार आहेत.
अमरिंदर यांनी स्पष्ट केले की, भाजपशी युती ही कृषी कायद्यांच्या समस्येच्या समाधानकारक निराकरणावर अवलंबून असेल. कारण पंजाबच्या भविष्यासाठी संघर्ष सुरू आहे. पंजाब आणि तेथील जनता आणि शेतकरी एक वर्षाहून अधिक काळ त्यांच्या अस्तित्वासाठी लढत आहेत. लवकरच शेतकऱ्यांच्या हिताचा काही उपाय सापडले अशी मला आशा आहे. त्यानंतर पंजाब विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत जागा कराराबाबत देखील मी आशावादी आहे.
अमरिंदर पुढे म्हणाले की, मी पंजाबच्या जनतेसाठी राजकारणात उभा आहे आणि राज्याचे हित सर्वांपेक्षा महत्त्वाचे आहे. तसेच 2022 च्या विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर पंजाबमध्ये सरकार बनवण्यावर माझा भर असेल. भाजपसोबत कोणत्याही वैचारिक समस्येच्या चर्चा करण्यास तयार असून याबाबतीत मी पंजाबच्या जनतेच्या पाठीशी उभा आहेत. पंजाबचे हित मला सर्वांपेक्षा वरचे वाटते आहे.
वास्तविक दि. 18 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी प्रथमच त्यांच्या भविष्यातील योजनांविषयी उघडपणे चर्चा केली आहे. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरच त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये न येण्याचे म्हटले आहे. आता त्यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये सामील न होण्याच्या मुद्द्याचा पुनरुच्चार केला, परंतु त्यासोबत युती करायला आवडेल असेही सांगितले. अमरिंदर यांनी असेही म्हटले की, मी भाजपला जातीयवादी आणि मुस्लिमविरोधी मानत नाहीत. तसेच शेतकरी आंदोलनापूर्वी पंजाबमध्ये मोदी सरकारला कोणताही विरोध नव्हता. नंतर आम्ही विरोध केला, मात्र, आता यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी उघड केले.
पंजाबमध्ये दहशतवादाच्या मुद्यांवर अमरिंदर म्हणाले की, मी तीन वर्षांपासून हा मुद्दा मांडत आहे. कारण पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि खलिस्तानी दहशतवादी स्लीपर सेलच्या माध्यमातून पंजाबमध्ये शस्त्रांचा पुरवठा करत आहेत. पण आता येणाऱ्या प्रचंड शस्त्रांचे प्रमाण मोठे त्रासदायक ठरत आहे. तसेच एके -47, पिस्तूल, ग्रेनेड, ड्रग्ज, मद्य आणि रोख रक्कम नेण्यासाठी ड्रोनच्या वापराकडेही अमरिंदर यांनी लक्ष वेधले. राज्याचा शेकडो लांबीचा परिसर हा आंतरराष्ट्रीय सीमेचा असल्याने त्याची चिंता आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी त्यांनी सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांची दिल्लीत भेट घेतली होती.