नवी दिल्ली – पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी गेल्या दोन दिवसात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची भेट घेतल्याने राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. राष्ट्रीय सुरक्षेबद्दल त्यांनी शहा आणि डोभाल यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. परंतु कॅप्टन अमरिंदर सिंग यांची राष्ट्रवादी प्रतिमा बळकट करण्याची ही रणनीती असून, भविष्यातील राजकीय मार्ग तयार करण्याची तयारी असल्याचे बोलले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपसुद्धा अमरिंदर यांचा पक्षप्रवेशास घाई करत नसल्याचे दिसून येत आहे.. कारण कृषी कायद्यांबाबत अमरिंदर सिंग यांची भूमिका वेगळी आहे. पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी इतक्या लवकर ते आपली राजकीय भूमिका बदलण्याची शक्यता कमीच आहे. भविष्यात केंद्र सरकारने एमएसपीसंदर्भात निर्णय घेतला तर अमरिंदर यांचे भाजपसोबत सूत जुळू शकतात.
काँग्रेसमधून बाहेर पडण्याची घोषणा करून तसेच अमित शहा यांची भेट घेऊन भाजपशीची मिळतीजुळती राष्ट्रवादी प्रतिमा बनविण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. भाजप पंजाबमध्ये खूपच सजग झाला आहे. अकाली दल आणि भाजप वेगळे झाले असले तरी तो त्यांचा जुना सहकारी पक्ष आहे. त्यांच्यात वैचारिक मतभेद नाहीत. शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर तोडगा काढल्यानंतर दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात. त्यामुळे कितीही वेळ लागला तरी नुकसान होईल असा कोणताही प्रयोग भाजप करणार नाही.
पंजाबमधील आपली ताकद वाढविण्यासाठी २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत स्वबळावर काही जागा जिंकण्याचा प्रयत्न भाजपचा असेल. अमरिंदर सिंग यांच्यासोबत भविष्यातील राजकारण करू शकतात. परंतु सध्या ते कॅप्टन कोणत्या बाबतीत बळकट आहेत याचा शोध घेत आहेत. कॅप्टनसोबत असणारे नेते भाजपबरोबर येतील की नाही हासुद्धा प्रश्न आहे. त्यामुळे भाजप सध्या आपले डाव खेळत नाहीये. अमरिंदर यांनीही कोणत्याही मोठ्या नेत्याची भेट घेतली नाहीय. कॅप्टन अमरिंदर यांनी नवा पक्षा स्थानप केला तर त्यांच्या पक्षासोबत अंतर्गत ताळमेळ बसविण्याचा प्रयत्न भाजप करू शकतो.