चंदीगड – पंजाब काँग्रेसमधील धुसफूस शमण्याची चिन्हे नसून उलट ती वाढण्याची चिन्हे आहेत. नवज्योतसिंग सिद्धू यांनी राज्याच्या काँग्रेस आमदारांची बैठक घेतली. तर दुसरीकडे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सुद्धा आपल्या निकटवर्तीय मंत्री आणि आमदारांची बैठक घेतली. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग राजीनामा देण्याची शक्यता त्यांच्या माध्यम सल्लागारांनी फेटाळून लावली आहे. दरम्यान, पक्षश्रेष्ठींकडून नवज्योत सिंग सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष बनविण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
मंत्री चरणजित सिंह चन्नी, सुखविंदर सिंह सरकारिया आणि तृप्त राजिंदर सिंह बाजवा मंत्री सुखजिंदर रंधावा, कुलजित जिरा, बरिंदरजित सिंग पाहाडा, कुशलदीप ढिल्लो यांच्यासोबत सिद्धू यांनी बैठक घेतली. बैठकीतील चर्चेबाबतची माहिती अद्याप कळविण्यात आली नाही.
दुसरीकडे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग राजीनामा देणार असल्याची जोरदार चर्चाही सुरू झाली. कॅप्टन सिंग यांनी मात्र राजीनाम्याची शक्यता फेटाळून लावली. अशा प्रकारच्या चर्चांना कोणताही आधार नाही. २०२२ च्या निवडणुकीचेसुद्धा कॅप्टन अमरिंदर सिंग हेच नेतृत्व करणार आहेत, असे कॅप्टन सिंग यांचे माध्यम सल्लागार रवीन ठुकराल म्हणाले.
पंजाबच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाबाबतची स्थिती जवळजवळ स्पष्ट झाली आहे. नवज्योत सिंग सिद्धू प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात, असे संकेत पंजाबचे प्रभारी हरिश रावत यांनी दिले. पंजाब काँग्रेसच्या अंतर्गत वादावर फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री सिंग आणि सिद्धू हे दोघेही मिळून पक्षाचे कार्य करतील, असे त्यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी तयार केलेल्या फॉर्म्युलाअंतर्गत नवज्योत सिंग सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष पद देण्यासह कॅप्टन अमरिंदर सिंग निवडणूक प्रचाराच्या समितीचे अध्यक्ष असतील. विजय इंदर सिंगला आणि संतोख चौधरी यांना कार्यकारी अध्यक्षपद देण्यात आले आहे. निवडणूक जाहीरनामा समितीचे अध्यक्षपद प्रताप सिंग बाजवा यांना देण्यात आले आहे. या नावांची कधीही घोषणा होऊ शकते.