चंडीगढ – काँग्रेसने पंजाबमध्ये नेतृत्वबदल करूनही राजकीय उलथापालथ थांबण्याचे चिन्हे दिसत नाहीयेत. नवज्योत सिंग सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर तो पक्षश्रेष्ठींनी फेटाळल्याचे समजते. या वादावर लवकरच तोडगा काढला जाईल असे काँग्रेस नेतृत्वाकडून सांगितले जात आहे. परंतु आता कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या समर्थक आमदारांनी विश्वासदर्शक ठरावाची मागणी केल्याने नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी सरकारच्या भवितव्याबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
चन्नी मंत्रिमंडळ स्थापन करताना सिद्धू यांचे मत न घेतल्याने ते नाराज आहेत, असे बोलले जात आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर मंत्री परगट सिंग आणि अमरिंदल सिंग राजा यांनी सिद्धू यांची भेट घेऊन गैरसमज मिटविण्याबाबत चर्चा केली. दोन-तीन मुद्दयांबाबत गैरसमज झाले आहेत. ते एका दिवसात दूर केले जातील, असे परगट सिंग यांनी सांगितले.
सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या गटाच्या आमदार आणि मंत्र्यांनीही राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छाता तसेच बालविकासमंत्री रझिया सुलताना यांनी राजीनामा दिला आहे. तसेच गुलजार इंदर चहल यांनी पंजाब काँग्रेस कोषाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. चन्नी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गुलजार यांची पंजाब काँग्रेस प्रदेश कोषाध्यक्षपदी निवड झाली होती. काँग्रेसच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा देऊन योगिंदर धिंग्रा यांनी सिद्धू यांना पाठिंबा दिला आहे. दरम्यान, पंजाबमध्ये राजीनामा नाट्य सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर एक ऑक्टोबरला होणारी मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री चन्नी यांनी बुधवारी (२९ सप्टेंबर) बोलावली आहे.