इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ब्रह्म शंकर झिम्पा यांनी पंजाब सरकारचे महसूल, जलसंपदा आणि पाणीपुरवठा मंत्री म्हणून पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी दालनातील वातावरण शुद्ध करण्यासाठी पूजा केली. कॅबिनेट मंत्री ब्रह्मशंकर झिम्पा यांनी खुर्चीचेही पूजन केले. त्याचबरोबर दालनात अगरबत्ती लावून वातावरण शुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. इतके करुनही त्यांच्या कार्यालयात असलेली दुर्गंधी कमी झाली नसल्याने उपस्थित सगळेच हैराण झाले होते.
झिम्पा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या काम करण्याच्या खोलीत प्रवेश केला. मात्र तिथे प्रचंड दुर्गंध येत होती. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी तिथे पूजा केली. धूप, अगरबत्ती लावली मात्र तरीही दुर्गंध जात नव्हता. सर्व उपाययोजना करूनही खोलीतून येणारा दुर्गंधी मिटत नसल्याने मंत्र्यांनी त्याच अवस्थेत बैठक घेतली. यामुळे अधिकारीही बराच वेळ गप्प बसले. त्याचवेळी ब्रह्मशंकर झिम्पा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भ्रष्टाचार संपविण्याचा आग्रह धरला. मंत्र्यांनी सांगितले की, अनेक सुधारणा करण्याची गरज आहे. सरकारी कार्यालयांचे कामकाज वाढवण्यावरही त्यांनी भर दिला. तहसील स्तरावर भ्रष्टाचारमुक्त प्रशासन सामान्य जनतेला देण्यासाठी भ्रष्टाचाराला आळा बसणार असल्याचे झिम्पा यांनी सांगितले.
तसेच महसूल विभागाच्या तहसील स्तरावरील कार्यालयातील प्रशासकीय यंत्रणा सुधारली जाईल. तसेच सर्वसामान्यांच्या गरजा लक्षात घेऊन महसूल अभिलेखांचे भाषांतरही केले जाणार आहे. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे ब्रह्म शंकर झिंपा यांनी सांगितले
त्याचबरोबर नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट असेल, असेही ते म्हणाले. भूजल संवर्धनासाठी ठोस पावले उचलली जातील. पावसाचे पाणी साठवून प्रकल्प मोठ्या प्रमाणावर पुढे नेण्याचे काम शासन करणार असल्याचे झिम्पा यांनी सांगितले. याशिवाय, पाणीपुरवठा योजनांवरील वीजबिलाचा अतिरिक्त भार कमी करण्यासाठी सरकार वीज पंपांचे सौरऊर्जेवर चालणाऱ्या पंपांमध्ये रूपांतर करण्याचे काम करेल. दुर्गंधाच्या वातावरणातच बैठक पार पडल्यानंतर मात्र, त्या खोलीतील एसीमध्ये उंदीर मेलेला आढळला, त्यामुळे दुर्गंधी येत होती, हे स्पष्ट झाले. लगेचच त्या मेलेल्या उंदराला दूर करुन कार्यालयाची स्वच्छता करण्यात आली.