मुंंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंजाब नॅशनल बँक (PNB) ही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये आघाडीचे नाव आहे. या बँकेने आपले पॉझिटिव्ह पे सिस्टिमच्या नियमांमध्ये बदल केले आहे. या नवीन नियमांनुसार १० लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त पैसे भरल्यास पॉझिटिव्ह पे सिस्टिमद्वारे पडताळणी करणे अनिवार्य असणार आहे. ४ एप्रिल २०२२पासून हा नियम लागू होणार आहे. पंजाब नॅशनल बँकेने नुकतेच ट्विट करुन माहिती दिली आहे. चेक फ्रॉडपासून वाचवण्यासाठी नियमात बदल करत असल्याचे सांगत, खातेधारक चेकचे तपशील शाखेत किंवा डिजिटल माध्यमातून जमा करु शकणार आहेत. ग्राहक चेकद्वारे १० लाख किंवा त्याहून अधिक रक्कम भरत असल्यास पॉझिटिव्ह पेमेंट सिस्टीममध्ये खातरजमा करावी लागणार आहे. यामुळे चेक फ्रॉडपासून ग्राहकांचे संरक्षण होईल. पीएनबी ग्राहक बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा १८००१८०२२२२ किंवा १८००१०३२२२२ या क्रमांकावर कॉल करुन अधिक माहिती मिळू शकणार आहे.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने विकसित केलेल्या पॉझिटिव्ह पेमेंट सिस्टीमनुसार, जास्त रकमेचा चेक जारी करणाऱ्या ग्राहकाला काही महत्त्वाचे तपशील पुन्हा पडताळावे लागतात. पेमेंट करण्यापूर्वी चेक क्लिअरिंगमध्ये सादर करताना तपशील क्रॉस-चेक केले जातात. बँकेने म्हटले आहे की त्यांच्या ग्राहकांना खाते क्रमांक, चेक क्रमांक, अल्फा कोड, जारी करण्याची तारीख, रक्कम, पॉझिटिव्ह पेमेट सिस्टीम अंतर्गत जास्त रकमेचे चेक क्लिअर करण्यासाठी लाभार्थीचे नाव सांगावे लागणार आहे. चेक क्लिअरिंगच्या किमान २४ तास अगोदर हे तपशील बँकेसोबत शेअर करावे लागतील. ग्राहक त्यांच्या इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, एसएमएस बँकिंग किंवा त्यांच्या होम ब्रँचद्वारे दिलेल्या नमुन्यात तपशील शेअर करू शकतात. गेल्या वर्षी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने उच्च मूल्याच्या चेकच्या फसव्या संकलनापासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी, पॉझिटिव्ह पेमेंट सिस्टीमलागू करण्यासाठी बँकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.