मुंबई – सरकारी आणि खासगी बँका आपले खातेदार तथा ग्राहक यांच्या बचत खात्यामध्ये व्याज जमा करत असतात. तसेच मुदत ठेवीवर देखील व्याज देण्यात येते. परंतु काही वेळा या व्याजदरांमध्ये बदल करण्यात येतो. पंजाब नॅशनल बँकेने देखील आपल्या व्याजदरांमध्ये आता काही बदल केले आहेत.
बँकेने व्याजदरात कपात केल्याने ग्राहकांना त्याचा फटका बसणार आहे. पंजाब नॅशनल बँकेने (PNB) 10 लाख रुपयांपेक्षा कमी बचत खात्यावरील ठेवींवरील व्याज दर वार्षिक 2.80 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. तर 10 लाखांपेक्षा जास्त बचत खात्यावरील व्याजदर 2.85 टक्क्यां पर्यंत कमी केले आहेत. या सरकारी बँकेने 10 लाखांपेक्षा कमी आणि 10 लाखांपेक्षा जास्त असलेल्या खात्यांवरील बचत दर अनुक्रमे 10 आणि 5 पाँईटने कमी केला आहे. सुधारित घरगुती आणि NRI बचत खात्यावरील व्याज सध्याच्या आणि नवीन अशा दोन्ही ग्राहकांसाठी आज म्हणजेच दि. 1 डिसेंबर 2021 पासून लागू आहे.
बॅंकेच्या बचत निधी खात्यातील 10 लाखांपेक्षा कमी शिल्लक ठेवींवर तसेच बचत निधी खात्यातील 10 लाखांपेक्षा जास्त रकमेवर व्याजदर यामध्ये मोठा बदल केला आहे. पंजाब नॅशनल बँक सध्या 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदत ठेवींवर 2.9 ते 5.25 टक्के दरम्यान व्याज दर देत आहे. तसेच 7 ते 45 दिवसांच्या मुदत ठेवींवर 2.9 टक्के व्याज दर देत आहे. त्याचप्रमाणे 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या मदत ठेव (FD ) वर तो 4.4 टक्क्यांपर्यंत जातो. पंजाब नॅशनल बँक एक वर्ष ते दोन वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवर 5.10 टक्के व्याज देते. 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपर्यंतच्या ठेवींवरही बँक 5.10 टक्के व्याज ऑफर करते. तसेच 5 वर्ष ते 10 वर्षांपर्यंतच्या ठेवींवर 5.25 टक्के व्याज देते. हे दर दि. 1 ऑगस्ट 2021 पासून लागू आहेत.