इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पंजाब मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्यात आलेले मंत्री विजय सिंगला यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी चौकशीदरम्यान अनेक मोठे खुलासे झाले आहेत. या प्रकरणात राज्याचे काही आमदार, मंत्री आणि इतर जण चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. सिंगला यांनी पाच सहकाऱ्यांच्या मदतीने कमिशन नेटवर्क वाढविले होते, असा खुलासा झाला आहे. सिंगला यांना मंगळवारी राज्य मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटक केली होती.
ओएसडी प्रदीप बंसल यांच्याशिवाय आणखी तीन नावे समोर आली आहेत. मनसा येथे राहणारे दोन जण विशाल ऊर्फ लवी आणि जोगेश कुमार यांच्या नावाचा समावेश आहे. हे दोघेही अनधिकृतरित्या सिंगला यांचे खासगी सहकारी म्हणून काम करत होते. विशाल हा कीटकनाशक उत्पादनांचा डिलर आहे. जोगेश कुमार हा भट्ट्यांचा मालक आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, हे दोघेही डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे काम पाहात होते. विनापरवानगी कोणाचीही बदली करू नये, असे निर्देश मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. बदलीसाठी इच्छुक असणाऱ्यांना कथितरित्या एका महिन्याचा पगार मंत्र्यांना देण्यास सांगण्यात आले होते. त्याशिवाय व्यवसायाने दंतशल्यचिकित्सक डॉक्टर गिरीश गर्ग यांचे नाव समोर आले आहे. ते भटिंडा येथे राज्य आरोग्य विभागासोबत काम करत आहेत. त्यांच्याकडे आर्थिक देवाणघेवाण करण्याची जबाबादारी सोपविल्याचा आरोप होता. परंतु त्यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, सिंगला यांचे बरनाला येथील आणखी एका जवळच्या नातेवाईकाचे काम चौकशीच्या फेऱ्यात आले आहे. सिंगला यांचे सहकाऱ्यांशिवाय दोन इतर कॅबिनेट मंत्री आणि तीन आमदारही फेऱ्यात अडकले आहेत. या प्रकरणी चौकशी सुरू असून, कोणालाही मुक्त सोडले जाणार नाही, असे आपचे प्रवक्ते मलविंदर सिंह कांग यांनी सांगितले.