इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सर्वसामान्यपणे चोर- दरोडेखोर हे शहराबाहेर असलेले बंगले किंवा सुनसान जागी जेथे पहारा नाही किंवा सुरक्षा गार्ड नाही, अशा ठिकाणी चोऱ्या करतात. बडे अधिकारी, मंत्री- माजी मंत्री, आमदार – खासदार यांच्या निवासस्थानी मोठा पोलीस बंदोबस्त किंवा सुरक्षारक्षक तैनात असतात. त्यामुळे शक्यतो त्यांच्या घरी चोऱ्या होत नाहीत, असे म्हटले जाते. परंतु पंजाब मधील हे चोरटे फारच धाडसी निघाले. त्यांनी चक्क माजी मंत्र्याच्या घरी दरोडा टाकला. विशेष म्हणजे या बंगल्यात काम करणाऱ्या नोकराचाच सहभाग होता. बंगल्यातील मंडळींना गुंगीचे औषध देऊन त्यांनी ऐवजावर डल्ला मारला, या घटनेमुळे पोलीस देखील हैराण झाले असून या संदर्भात आता तातडीने तपास सुरू करण्यात आला आहे.
असे दिले गुंगीचे औषध
पंजाबमध्ये एकेकाळी अकाली दलाची सत्ता होती, तर सध्या आम आदमी पार्टीची सत्ता आहे. पूर्वी अकाली दल सत्तेत असताना मंत्रिपदावर असलेले आणि सध्या माजी मंत्री असलेल्या जगदीश सिंग गरचा यांच्या घरात ही धक्कादायक घटना घडली आहे. जगदीश सिंग व त्यांच्या कुटुंबाला बेशुद्ध करून नोकराने घरांतील मुद्देमाल लुटून पलायन केले आहे. नोकराने गरचा यांच्यासह त्यांची पत्नी, बहीण आणि एका मोलकरणीला रात्रीच्या जेवणातून गुंगीचे औषध दिले. यामुळे सर्व बेशुद्ध झाले. यानंतर या नोकराने पैसे, दागिने सर्व लुटून पलायन केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरु केला आहे. जगदीश सिंग यांना बेशुद्धावस्थेतच लुधियानाच्या हॉस्पटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. माजी मंत्र्यांच्या घरासमोर अचानक बऱ्याच वर्षांनी एवढा पोलीस फौजफाटा पाहून परिसरातील लोकांनाही धक्का बसला होता. नंतर त्यांना खरा प्रकार समजला तेव्हा या घटनेची एकच चर्चा सुरू होती.
आणि त्याने डाव साधला…
माजी मंत्री घरच्या यांच्या घरात पूर्वी एक नोकर काम करत होता, परंतु तो सोडून गेला तसेच त्यांना आणखी नोकरीची आवश्यकता होती त्यामुळे तीन महिन्यांपूर्वीच या नोकराला कामावर ठेवण्यात आले होते. एक-दोन महिने या नोकराने प्रामाणिकपणे काम केले नंतर त्याने डाव साधण्यासाठी एक गुप्त प्लॅन तयार केला. त्यानंतर लुटमारीसाठी त्याने काही साथीदारांना बोलविले होते. विशेष म्हणजे माजी मंत्र्यांच्या घराचे नुतनीकरणाचे काम सुरु आहे. यासाठी सकाळी नेहमीप्रमाणे काही मजूर कामावर आले होते. तेव्हा बराच वेळ कोणी दरवाजा उघडला नाही, म्हणून ते वाट पाहत पायऱ्यांवरच बसले होते. त्यानंतर माजी मंत्र्यांचा वाहनचालक जेव्हा आला तेव्हा हा सर्व भयानक प्रकार उघड झाला. खिडकी उघडी करून तो आत गेला असता चारही जण बेशुद्धावस्थेत आढळले होते. चौकशीत पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.
Punjab Crime Ex Minister Home Dacoity Theft Police
Servant Robbery Household Family