चंदीगड – मध्यंतरी पंजाब कॉँग्रेसमधला घरगुती ड्रामा सर्व देशाने पाहिला. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग विरूद्ध क्रिकेटपटू राजकारणी नवज्योतसिंग सिद्धू असा हा सामना कॉँग्रेसच्या घरच्याच खेळपट्टीवर कसोटी सामन्यासारखा दीर्घकाळ रंगला. त्यात अर्थातच ज्येष्ठ आणि निष्ठावंत कॉँग्रेसकार्यकर्ते तत्कालिन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांना राजीनामा देऊन मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागले. कारण काय तर सिद्धू यांनी त्यांच्यावर केलेली सततची राजकीय गोलंदाजी आणि फिरकी. त्यात ते बाद झाले. त्यानंतर आपल्याला सामनावीर घोषित करून पंजाबचे कप्तानपद अर्थातच मुख्यमंत्रीपद सोपविले जाईल अशी सिद्धू यांना अपेक्षा होती, पण मुरलेल्या कॉँग्रेस श्रेष्ठींनी ती सपशेल फोल ठरविली आणि कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदावर नवज्योतसिंगांची बोळवण केली. त्यामुळे नाराज झालेल्या सिद्धूचा तीळपापड झाला आणि त्यांचे प्रदेशाध्यक्षपदाचे राजीनामा नाट्य चांगलेच रंगले. मात्र मध्यंतरी उत्तर प्रदेशच्या एका घटनेनंतर सिद्धूही आंदोलनात सहभागी होऊन त्यांनी पुन्हा कॉँग्रेसनिष्ठा दाखवली. तसेच सर्व काही आलबेल असल्याचे दाखविले. मात्र दिसते तसे नसते हेच खरे.
सिद्धूची आत्मसंतुष्टी अजूनही झालेली दिसत नाही. त्यांनी पुन्हा एकदा नव्या मुख्यमंत्र्यांवर तोफ डागायला सुरूवात केली आहे. त्यामुळे कॉँग्रेसमध्ये पुन्हा दुफळी होण्याची चिन्हे असून ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंजाबात कॉँग्रेस पक्ष अडचणीत आला आहे. याचा अर्थातच फायदा विरोधकांना होऊ शकतो. पंजाबचे नवनियुक्त आणि तरुण मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी अलीकडेच आपल्या जनतेला खूष ठेवण्यासाठी मोठ्या घोषणांचा सपाटा लावला आहे. त्यापैकी एक आहे घरगुती वापराच्या वीजदराचे दर प्रति युनिट तीन रुपयांनी कमी करण्याची आणि दुसरी घोषणा आहे, राज्य सरकारी कर्मचाºयांचा महागाई भत्ता वाढविण्याची. मात्र पक्षातलेच विरोधक असलेल्या सिद्धूंनी या निर्णयावर टिका केली आहे. हिंदू महासभेकडून आयोजित एका सभेदरम्यान त्यांनी हे खडे बोल सुनावले आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पात अशा गोंष्टींसाठी तरतूद नसल्याने या घोषणा कशा पोकळ ठरतात असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री चन्नी यांचा निर्णय म्हणजे मतदारांसाठी ‘लॉलीपॉप’ असल्याचे त्यांनी अप्रत्यक्ष रूपात सांगितले आहे. एका भाषणात त्यांनी निवडणुकीत मतदारांसाठी ‘लॉलीपॉप’ देणाºया नेत्यांवर टिका केली. आणि राज्याच्या विकासावर लक्ष केंद्रीत करून त्याआधारे मतदारांकडून मते मागण्याचे आव्हानही दिले. यात त्यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव घेतलेले नसले, तरी ती थेट चन्नीविरोधांतच होती हे सांगणे न लगे. बोलघेवडे सिद्धू आधी भाजपाचे नेते होते, मागच्या निवडणुकीत ते कॉँग्रेसमध्ये आलेत आणि मंत्रीही झाले, मात्र ते अजूनही विरोधी पक्षात असल्याप्रमाणे कॉँग्रेसवर टिका करत असतात. परिणामी सिद्धू असल्यावर विरोधी पक्षाची कॉँग्रेसला काय गरज अशी चर्चा आता त्यांच्याच पक्षातील कॉँग्रेस निष्ठावान करत असून ऐन निवडणुकीत पंजाब कॉंग्रेसमधील संघर्ष विरोधकांना फायदा करून देणार याचीच ही चिन्हं आहेत.