विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत कलह आता संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनलेला आहे. या कलहात पूर्वी केवळ राज्यातील काँग्रेस सहभागी होती, आता मात्र हाय कमांडने नेमलेल्या कमिटीचाही यात समावेश झाला आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या समर्थकांनी या प्रकरणात फिक्सिंग झाले आहे असा आरोप केल्यामुळे वादाला नवे वळण आले आहे.
मुख्य म्हणजे अंतर्गत कलह सोडविण्यासाठीच हायकमांडने तीन सदस्यांची कमिटी घोषित केली. या कमिटीने पहिली बैठक झाली आणि यात ८ मंत्री व १७ आमदार सहभागी झाले. परंतु, कमिटीतील एका सदस्याने आमदारांना फोन करून बैठकीत काय बोलायचे हे आधीच सांगून टाकले.
कमिटीसमोर काय बोलायचे हे आधीच सांगितल्याचा आरोप असून हे फिक्सिंग असल्याची तक्रार अमररिंदर सिंह यांच्या गटाने हाय कमांडकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांकडे या फिक्सिंगचे रेकॉर्डींग पोहोचले आणि ते तसेच्या तसे दिल्लीला पाठवले. तसेच कारवाईची मागणी केली. या प्रकरणात आता नवा वाद निर्माण झालेला आहे.
संघर्षात पक्षाचे नुकसान
राज्यातील एका वरीष्ठ मंत्र्याने मल्लिकार्जून खरगे, जयप्रकाश अग्रवाल आणि हरीश रावत यांच्या कमिटीपुढे कॅप्टन अमरिंदर सिंह व नवज्योतसिंग सिद्धू यांच्या संघर्षात पक्षाचे नुकसान होत असल्याची खंत व्यक्त केली. तर बैठकीपूर्वी काँग्रेसचे सचिव व राजस्थानचे मंत्री हरीश चौधरी यांनी आमदारांना फोन करून बैठकीत काय बोलायचे हे सांगितले होते. पण मुख्यमंत्र्यांपर्यंत हे प्रकरण पोहोचल्यावर वातावरण अधिकच तापले.
चौधरींचा कॉल रेकॉर्ड
पक्षातील उच्चस्तरीय सूत्रांकडून असे कळते की आमदार हरीश चौधरी यांनी ज्या आमदारांना फोन केला त्यांच्यातील काहींना त्यांचा कॉल रेकॉर्ड करून घेतला. तेच रेकॉर्डींग अमरिंदर सिंह यांच्यापर्यंत पोहोचले आणि आता ते राहुल गांधी व सोनिया गांधी यांच्यापर्यंत पोहोचले आहे.