इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांचे पक्षाच्या नेत्यांसोबत बैठकांचे सत्र सुरूच आहेत. पक्षांतर्गत कलह दूर करण्यासाठी या बैठका सुरू असल्याचे काही नेत्यांचे म्हणणे आहे. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार किंवा ज्यांना पक्षाकडून तिकीट मिळाले नाही, असे नेते या बैठकांमध्ये सहभागी होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालांनुसार, पंजाब काँग्रेसने १८ जागा जिंकून हातातील सत्ता गमावली होती. स्वतः सिद्धू यांना अमृतसर पूर्व या जागेवर पराभावाचा सामना करावा लागला होता.
नवज्योत सिंह सिद्धू यांनी १६ मार्च रोजी प्रदेशाध्यपदाचा राजीनामा दिला होता. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, दोन महिने काहीच बोलणार नसल्याची शपथ सिद्धू यांनी घेतली आहे, असा दावा त्यांच्या सहकाऱ्यांनी केला होता. तथापि, चार दिवसांनंतर सिद्धू यांनी सात काँग्रेस नेत्यांना घरी आमंत्रित केले होते. अशीच बैठक सुल्तानपूर लोधी येथे २६ मार्चला झाली होती. या बैठकीत २४ नेते उपस्थित होते. लुधियानामध्ये मंगळवारी चर्चांसह आणखी दोन बैठका होणार आहेत. या बैठकांमध्ये ३६ नेते सहभागी होऊ शकतात.
माजी आमदार नवतेज सिंह चिमा यांच्या दाव्यानुसार, पक्षांतर्गत मतभेद मिटविण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. ते म्हणाले, की २६ मार्च रोजी झालेल्या बैठकीत सहभागी झालेल्या ८ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती आणि ५ नेत्यांना तिकीट मिळाले नव्हते. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना चिमा म्हणाले, की अंतर्गत कलहाने आम्हाला मारले आहे. पक्षश्रेष्ठी हा कलह थांबवू शकले नाहीत. आम्ही सिद्धू यांना सांगितले की तुम्हाला काम करण्याची इच्छा असेल, तर आम्ही काम सुरू करू शकतो. जर आम्ही पुन्हा एकत्र येऊ शकणार नसेल, तर पक्षासाठी सर्व काही संपुष्टात आले आहे.
विशेष म्हणजे, पक्षाच्या १८ आमदारांपैकी फक्त सुखपाल खेडा आणि बलविंदर सिंग धालिवाह हे दोन नेते बैठकीसाठी पोहोचले होते. बैठकीत सहभागी नेत्यांच्या म्हणण्यानुसार, सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष बनण्याची आणखी एक संधी हवी आहे. माजी राज्यसभा खासदार प्रताप सिंह बाजवा आणि राज्याचे माजी गृहमंत्री सुखजिंदर सिंह रंधावा प्रदेशाध्यक्षपदाचे दावेदार समजले जात आहेत. दोन्ही नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत आपापल्या जागेवर विजय मिळवला होता.
दरम्यान, एका दुसऱ्या नेत्याने पराभूत झालेल्यांची सभा अशा शब्दात या बैठकांची संभावना केली आहे. ते म्हणाले, की पक्षाध्यक्ष स्वतः एका नवख्या उमेदवाराविरुद्ध पराभूत झाले आहे. कोणत्या तोंडाने ते दुसरी संधी मागत आहेत? “जित्तेगा पंजाब”, या सिद्धू यांच्या घोषणेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. “जित्तेगा पंजाब, असी सारे हारेंगे” अशी घोषणा त्यांनी द्यायला हवी होती, अशी टीकाही त्यांनी केली.