इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देऊन जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्यात आली आहे. अशाप्रकारे राज्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन दिली जाणार आहे. हा निर्णय राज्यातील लाखो माजी कर्मचाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे.
मुख्यमंत्री मान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत इतरही अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. धार्मिक ग्रंथांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना करात सूट देण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. याशिवाय पंजाबमधील तरुणांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्यासाठी भरती नियमांमध्ये बदल करण्यासही मान्यता देण्यात आली. त्याचवेळी मोहालीतील मेडिकल कॉलेजच्या नव्या जागेला मान्यता देण्याचा निर्णयही घेण्यात आला.
जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू केल्याबद्दल पंजाबमधील कर्मचाऱ्यांचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्विट केले की, “आम्ही पंजाबला वचन दिले आहे की पंजाबमध्ये जुनी पेन्शन योजना लागू केली जाईल. आज भगवंत मानजींनी वचन पूर्ण केले. पंजाबमधील सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन. नवी पेन्शन योजना अन्यायकारक आहे. जुनी पेन्शन योजना संपूर्ण देशात लागू करावी. हिमाचल प्रदेश आणि गुजरातच्या जनतेने संधी दिल्यास तेथेही जुनी पेन्शन योजना लागू केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
जुनी पेन्शन योजना पूर्ववत करणे हा गेल्या काही निवडणुकांमध्ये मोठा मुद्दा बनला आहे. काँग्रेसने राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू केली होती, तर केंद्र सरकारला ती पुनर्स्थापित करण्याचे आवाहन केले होते. त्याचबरोबर पुढील वर्षी मध्य प्रदेशात होणाऱ्या निवडणुकांबाबतही काँग्रेसने आश्वासन दिले आहे की, काँग्रेसचे सरकार आल्यास राजस्थान आणि छत्तीसगडप्रमाणे राज्यातही जुनी पेन्शन योजना पूर्ववत केली जाईल. त्याचवेळी आम आदमी पक्षाने हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये जुनी पेन्शन बहाल करण्याचे आश्वासन दिले आहे.
https://twitter.com/BhagwantMann/status/1583375958127837185?s=20&t=lqgIK_irPBznL5XUWUbQ1g
Punjab CM Mann Big Announcement Old Pension Scheme