नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संपूर्ण देशभरात सध्या एकच जोरदार चर्चा आहे ती पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांच्याच मंत्रिमंडळातील आरोग्यमंत्री विजय सिंगला यांची तडकाफडकी मंत्रिमंडळातून केलेली हकालपट्टी. सिंगला हे लाचखोर असल्याची कुणकुण मान यांना लागली. विशेष म्हणजे, याबाबत फारसे कुणालाही माहित नव्हते. मान यांनी गुप्त पद्धतीने सर्व माहिती काढली आणि आज थेट मोठा वार केला. पण, हे सर्व कसे घडले हे आपण आता जाणून घेणार आहोत.
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सत्ता स्थापन झाली. त्याचवेळी मानसा जिल्ह्यातील जनतेला फार आनंद झाला. कारण, तीन दशकांनंतर त्यांच्यातील एक लोकप्रतिनिधी सरकारमध्ये मंत्री झाला. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. कराराच्या बदल्यात शुक्राना (कमिशन) मागितल्याप्रकरणी आरोग्यमंत्री विजय सिंगला यांना बडतर्फीसह अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सिंगलांना आपल्या घरी बोलावले आणि ज्या ऑडिओ क्लिपमध्ये सिंगला शुक्रानाची मागणी करत आहेत तीच मुख्यमंत्र्यांनी त्यांना ऐकवली.
आरोग्यमंत्री विजय सिंगला हे टेंडर वाटपासाठी भटिंडा येथील रहिवाशांकडून पैसे देण्याची मागणी करत होते, असे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या एका अधिकाऱ्यानेच मंत्र्यांची पोल उघडली. सिंगला यांच्या अशा वागणुकीची या अधिकाऱ्यांना चांगलीच कल्पना होती. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून त्यांच्यासमोर मंत्र्यांचा कारभार मांडला. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्याला त्याच्या सुरक्षेचे आश्वासन दिले आणि पुरावे गोळा करण्यास सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता मंत्री सिंगला यांचा पर्दाफाश करण्यासाठी अधिकारी एकवटले. भटिंडा येथील एका व्यक्तीने टेंडर वाटपासाठी मंत्र्यांशी संपर्क साधून सहकार्य मागितले. त्याबदल्यात सिंगला याने त्या व्यक्तीकडून एक टक्का फीची मागणी केली. अधिकाऱ्याने त्यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केली.
हे रेकॉर्डिंग मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या स्तरावर विभागीय अधिकाऱ्यांकडे मंत्र्यांच्या वागणुकीची सखोल चौकशी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सिंगला यांना आपल्या घरी बोलवले. त्यांच्यासमोर रेकॉर्डिंग वाजविण्यात आले. रेकॉर्डिंग ऐकून आता काय करावे असे सिंगला यांना झाले. मुख्यमंत्र्यांनी विचारले की, हा आवाज तुमचा आहे का? ते तत्काळ हो म्हणाले. सूत्रांचे म्हणणे आहे की रेकॉर्डिंगमध्ये मंत्री कथितपणे त्या व्यक्तीला सांगत होते की त्याने आभार मानले पाहिजेत.
दरम्यान, सीएम भगवंत मान यांनी मोहालीत आरोपी मंत्र्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले. त्यानंतर सिंगला यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तात्काळ अटक केली आहे.