नवी दिल्ली – आतापर्यंत राजकारणात आश्चर्यतकित करणारे निर्णय घेण्यात भाजपचा हात कोणीच धरू शकत नाही असे मानले जायचे. परंतु पंजाबमध्ये चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्रिपदावर बसविण्याचा निर्णय घेऊन काँग्रेसनेही सर्वांना अचंबित केले आहे. पंजाबमध्ये प्रथमच दलित व्यक्ती मुख्यमंत्रिपदावर पोहोचला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांनाही धक्का देत काँग्रेस निवडणुकीसाठी आपला रस्ता बळकट करण्यास यशस्वी झाला आहे.
एक बाणाने अनेक लक्ष्य
पंजाबमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अंतर्गत कलाहाने हैराण झालेल्या काँग्रेसने चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री बनवून एका बाणाने अनेक लक्ष्य साधले आहेत. चन्नी हे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे विरोधक मानले जातात. पण ते सिद्धू यांच्या गुडबुकमध्येसुद्धा नाहीयेत. सुखविंदर सिंग रंधावा यांना मुख्यमंत्री बनविण्याचे प्रयत्न सिद्धू करत होते. कारण रंधावा यांनी सिद्धू यांना प्रदेशाध्यक्षपद मिळवून देण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. पण पक्षाने सिद्धू यांची म्हणणे नाकारले.
अकाली दल आणि आपला दे धक्का
चन्नी यांना मुख्यमंत्री बनवून काँग्रेसने अकाली दल आणि आम आदमी पक्षाची चाल त्यांच्यावरच उलटविली. आगामी निवडणुकीत दलित व्यक्तिला उपमुख्यमंत्री करणार असल्याची घोषणा या दोन्ही पक्षांनी केली होती. पंजाबमध्ये अकाली दल आणि बहुजन समाज पार्टी मिळून निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे दलितांची मते हातातून जातील अशी भीती काँग्रेसला सतावत होती.
अकाली दल-बसपाची २५ वर्षांनंतर युती
अकाली दल आणि बसपाने २५ वर्षांनंतर पुन्हा एका निवडणुकीआधी युती केली आहे. १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत अकाली दल आणि बसपाने एकत्रित निवडणूक लढविली होती. युतीने त्यावेळी १३ पैकी ११ जागा मिळविल्या होत्या. त्यामुळे कॅप्टन यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस पक्षाने या गोष्टीचा पूर्णपणे फायदा घेतला आहे. चन्नी यांना मुख्यमंत्री बनविण्याची घोषणा करून अकाली दल- बसपा युतीचा परिणाम संपविण्याचा प्रयत्न केला आहे.
पंजाबमध्ये ३२ टक्के दलित मते
पंजाबमध्ये दलित मतांचा आकडा जवळपास ३२ टक्के आहे. जालंधर, कपुरथला, होशियारपूर, नवाशहरमध्ये दलित मतदारांची संख्या ४० टक्के आहे. परंतु अकाली दल आणि काँग्रेसलाच दलित मतदार मतदान करतात. बसपाचे संस्थापक काशिराम यांचा पंजाबशी संबंध होता. त्यामुळे बसपाने नेहमीच पंजाबमध्ये आपले भवितव्य आजमावले आहे. परंतु मोठा फेरबदल करण्यास बसपाला यश आले नाही