चंदीगड – पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नवीन मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहे. दरम्यान सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या अंबिका सोनी यांन ऑफर दिली. पण, त्यांनी त्यास नकार दिल्यामुळे पेच निर्माण झाला आहे. या पदासाठी अमरिंदर सिंग यांचे जवळचे सुनील जाखड, नवज्योतसिंग सिध्दू, प्रताप बाजवा यांची नावे चर्चेत आहेत. या नावावर हरिश रावत, अजय माकन विचारमंथन करत आहे. आज सायंकाळपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत यश मिळावे यासाठी काँग्रेस मुख्यमंत्रीबरोबरच दोन उपमुख्यमंत्री निवडण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत यश मिळविण्यात कॅप्टन कमी पडतील याची कुणकुण काँग्रेस नेतृत्वाला लागल्यामुळे त्यांना राजीनामा देण्यास सांगितल्याचे बोलले जात आहे. पण, या राजीनाम्यानंतर कोणाला मुख्यमंत्री करायचे हे निश्चित नसल्यामुळे काँग्रेसपुढे पेच आहे. दरम्यान काँग्रेसने नवज्योतसिंग सिध्दू यांचे नाव पुढे केले तर त्याला अमरिंदर सिंग जोरदार विरोध करणार असल्यामुळे या पेचात भर पडली आहे. याबाबत त्यांनीच कालच जाहीरपणे सिध्दूच्या नावाला विरोध केला आहे.
आतापर्यंत पंजाब काँग्रेसच्या राजकारणात कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा एकसूत्री कारभार राहिला आहे. त्यांनी १९९८ मध्ये आपल्या अकाली दल (पंथिक) पक्षाचा काँग्रेसमध्ये विलय केला होता. चार वर्षांनंतर २००२ मध्ये ते मुख्यमंत्री झाले. २०१७ मधील निवडणुकीत काँग्रेसला कॅप्टन यांच्यामुळेच यश मिळाले. परंतु गेल्या साडेचार वर्षांत निवडणुकीतील आश्वासनांना पूर्ण करण्यास ते अपयशी ठरल्यामुळे त्यांना हे पद सोडावे लागले.