इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पंजाबमध्ये सत्ता येताच मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भ्रष्टाचार विरोधी मोहिम सुरू केली आहे. यासाठीच त्यांनी शहिद दिनाच्या दिवशी विशेष हेल्पलाईन सुरू केली आहे. त्यावर पहिल्या तक्रारीची दखल घेत भ्रष्टाचारी महिला जाळ्यात सापडली आहे. या महिलेविरोधात कारवाईचा बडगा देखील उगारण्यात आला आहे.
पंजाबमध्ये नव्याने सुरू झालेल्या भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइनवर आलेल्या तक्रारीच्या आधारे पहिली अटक करण्यात आली आहे. २३ मार्च रोजी ९५०१२००२०० या क्रमांकाची हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. या क्रमांकावर फोन करत तहसीलदाक कार्यालयातील महिला लिपिकाची तक्रार एका व्यक्तीने केली होती. त्याने दिलेल्या फिर्यादीत तहसीलदार १ कार्यालयातील महिला लिपिकाने नोकरी लावण्यासाठी ४.८० लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केला आहे. मीना असे तिचे नाव असून, वर्षभरात ही अनधिकृत रक्कम तिने स्वीकारली आहे. ४.८० लाख रुपयांपैकी बरेचसे पैसे तिच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले होते, तर एक लाख रुपये तिने रोख मागितले होते. मीना ही सध्या दोन महिन्यांची गरोदर आहे. तिची वैद्यकीय तपासणी, कार्यालयीन चौकशी केल्यानंतर ताब्यात तिला घेण्यात आले आहे. तसेच तिच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
जेव्हा हेल्पलाइन क्रमांकावर तक्रारदाराचा फोन आला तेव्हा लगेचच अँटीकरप्शन ब्युरो म्हणजेच भ्रष्टाचारविरोधात काम करणाऱ्या गटाने चौकशी सुरु केली. या चौकशीनंतर तक्रार खरी असल्याचे निरिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी नोंदवले व मीना दोषी असल्याचे जाहीर केले. मीना हिने तक्रारदाराला त्याच्या मुलीला लुधियाना येथे नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी सातत्याने पैशांची मागणी तिच्याकडून केली जात होती.