इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशभरातील पाच राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीने पंजाब मध्ये दणदणीत विजय मिळवला असून सत्ता काबीज केली आहे. त्यानंतर आता पंजाबमध्ये निवडणूक जिंकल्यानंतर आम आदमी पार्टीने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. दिल्लीच्या धर्तीवर आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी सरकारी कार्यालये आणि रुग्णालयांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे.
आम आदमी पक्षाच्या चार आमदारांनी पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील अनेक सरकारी कार्यालये आणि सिव्हिल हॉस्पिटलवर छापे टाकून तेथे पुरवल्या जाणाऱ्या सेवांचा आढावा घेतला. नहाल सिंग वालाचे आमदार मनजीत सिंग बिलासपूर, धरमकोटचे आमदार देवेंद्र सिंग धोस, बाघापुराणाचे आमदार अमरपाल सिंग सुखंद आणि डॉ अमरप्रीत कौर यांनीही उपायुक्त हरीश नायर आणि एसएसपी चरणजीत सिंग सोहल यांची भेट घेतली.
एका अहवालानुसार, या नवनिर्वाचित आमदारांनी पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन जनतेला त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांची तक्रार केली आहे. प्रदीर्घ काळ एकाच ठिकाणी राहणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याचे आमदारांनी या संदर्भात बोलताना सांगितले. त्यानंतर सरकारी कंत्राटदारांचा क्रमांक येईल. रूग्णालयात तपासणी केली असता प्राथमिक स्तरावरील सुविधाही रूग्णालयात उपलब्ध नसल्याचे आढळून आल्याने त्यांनी प्रशासकीय बैठका घेणार असल्याचे सांगितले.
उल्लेखनीय बाब ही आहे की, भगवंत मान यांनी पंजाबच्या जनतेला वचन दिले होते की पंजाबमध्ये त्यांचे सरकार आले तर आम आदमी पक्ष एक चांगले मंत्रिमंडळ तयार करेल आणि ऐतिहासिक निर्णय घेईल. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, भगवंत मान हे आज (१६ मार्च) पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्या दिवशी सर्वांनी पिवळे फेटे आणि महिलांनी पिवळी शाल घालावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. नवाशहर जिल्ह्यातील शहीद-ए-आझम भगतसिंग यांचे गाव खटकर कलान येथे भगवंत मान यांचा शपथविधी सोहळा होणार आहे.