इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपचे नेते भगवंत मान हे लवकरच पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. दरम्यान, त्याआधी पंजाबमध्ये काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी बोलताना मान म्हणाले की, सरकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांचा नाही, तर शहीद भगतसिंह आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावला जाईल. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येणार आहे. याप्रसंगी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल देखील उपस्थित होते. भगवंत मान यांनी सरकारी कार्यालयांतील फोटोंबाबत केलेल्या घोषणेनंतर उपस्थितांनी जल्लोष केला. दरम्यान, याबोसत भगवंत मान यांनी सुरक्षेच्या कर्तव्यावर तैनात असलेल्या पोलिसांच्या बाबतीतही महत्त्वाचे निर्णय घेतला आहे.
पंजाब विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ९२ उमेदवार निवडून आणत आपने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यानिमित्त मतदारांचे आभार मानण्यासाठी पंजाबमध्ये विजयी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भगवंत मान यांनी महत्त्वाची घोषणा केली की, 122 व्यक्तींची सुरक्षा कमी केल्यामुळे 403 पोलिसांसह 27 पोलिस वाहने आता पुन्हा एकदा पोलिस स्थानकात जाणार असल्याची माहिती भगवंत मान यांनी दिली आहे.
पंजाबमध्ये आपचं सरकार जुन्या परंपरागत गोष्टींमधून बाहेर पडून नव्या पद्धतीने काम करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी मान यांनी व्यक्त केला. पंजाबमध्ये आपचे सरकार येईल, असा विश्वास आपल्याला आधीपासूनच होता, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
दि.16 मार्च रोजी पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून भगवंत मान हे शपथ घेतील. त्यांचा शपथविधी सोहळा मोठा थाटात व्हावा, यासाठी आपकडूनही जोरदार तयारी केली जाते आहेत. दरम्यान, रविवारी केजरीवाल आणि भगवंत मान यांनी सुवर्ण मंदिरात जाऊन प्रार्थना केली. सरकार स्थापनेआधी भगवंत मान यांनी पोलिस सुरक्षेसोबत सरकारी कार्यालयातील फोटोंवरुन घेतलेल्या निर्णयांचेही सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.