इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पंजाबमध्ये आम आदमी पार्टीच्या सरकारला एक महिना पूर्ण झाला असून, पक्षाच्या जाहीरनाम्यानुसार आता एक एक आश्वासन पूर्ण केले जात आहे. मोफत वीज देण्याचे आश्वासन त्यापैकी एक. आता राज्य सरकारने नागरिकांना मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. १ जुलैपासून नागरिकांना ३०० युनिट वीज मोफत मिळणार आहे. मोफत वीज देताना यामध्ये काही अटींचा समावेश केला आहे. त्याशिवाय मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ३१ डिसेंबरपर्यंत काही वीजबिले माफ करण्याचाही निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री मान म्हणाले, की एखाद्या घरात दोन महिन्यांमध्ये ६०० युनिटहून अधिक विजेचा वापर झाला, तर त्यांना संपूर्ण विजेचे बिल अदा करावे लागेल. अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय आणि दारिद्य्र रेषेखालील कुटुंबे आणि स्वातंत्र्यसैनिकांनासुद्धा ६०० युनिट मोफत वीज मिळणार आहे. परंतु दोन महिन्यांत जर ते ६०० युनिटपेक्षा अधिक विजेचा वापर करत असतील, तर त्यांना फक्त अतिरिक्त बिल अदा करावे लागणार आहे.
या कुटुंबांना पूर्वी २०० युनिट वीज मोफत मिळत होती. मुख्यमंत्री म्हणाले, की उद्योग आणि व्यावसायिक ग्राहकांचे टेरिफ वाढवले जाणार नाहीत. कृषी क्षेत्रासाठी मोफत वीज कायम सुरू राहणार आहे. राज्यातील ८० टक्के कुटुंबासाठी हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, की पंजाबमध्ये जवळपास ७३ लाख घरगुती ग्राहक आहेत. त्यापैकी ६१ लाख नागरिकांना फायदा होणार आहे. सरकारने २ किलोवॉट वीज वारणाऱ्यांचे ३१ डिसेंबर २०२१ पर्यंतचे वीजबिल माफ करण्याची घोषणा केली आहे. नागरिकांना मोफत आणि स्वस्त वीज उपलब्ध करून देण्यासाठी ट्रान्समिशन लॉस, कोळशाचा तुटवडा आणि कायदेशीर मुद्द्यांसारखे अडथळे येणार आहेत. हे अडथळे दूर करण्यावर आमचे काम सुरू आहे.