नवी दिल्ली – पंजाब काँग्रेसमध्ये पुन्हा संकट वाढताना दिसत आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा विरोध असतानाही नवज्योत सिंह सिद्धू यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून पक्षाने नवे नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न केला. परंतु हेच प्रयत्न पक्षाला डोकेदुखी ठरू पाहात आहेत. दोन नेत्यांच्या लढाईत काँग्रेस पूर्णपणे फसली आहे. दोघांमधील संघर्ष अद्याप कमी होणार नाही, असे पक्षाच्या नेत्याने सांगितले. तिकीटवाटपावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला आहे. निवडणुकीनंतर आपली बाजू भक्कम करण्यासाठी दोघांकडूनही आपापल्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संधी मिळावी प्रयत्न सुरू आहेत.
पंजाब काँग्रेसच्या एका पदाधिका-यांच्या म्हणण्यानुसार, दोघांच्या संघर्षामुळे सामान्य कार्यकर्ते नाराज आहेत. निवडणुकीसाठी स्वतःला सिद्ध करण्याऐवजी पक्षांतर्गत हेवेदावे आणि वादामुळे कलह निर्माण झाला आहे. कोणत्याही राजकीय पक्षासाठी ही चांगली बाब नाही. एकत्रितरित्या लढा देण्याऐवजी आम्ही आपापसात भांडत आहोत. शेतकरी आंदोलन, भाजप आणि अकाली दलातील युती समाप्त झाल्यामुळे कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या कामावरून काँग्रेसला पंजाबमध्ये विजयाचा विश्वास होता. परंतु गेल्या काही महिन्यापासून अंतर्गत कलहामुळे पक्षातील कार्यकर्त्यांचा विश्वास डगमगला आहे. निवडणुकीपेक्षा पक्षात अंहकाराची लढाई सुरू झाली आहे.
वरिष्ठ नेते सांगतात, कॅप्टन आणि सिद्धू यांना कोणतेही वादग्रस्त वक्तव्य टाळून पक्षांतर्गत ताळमेळ ठेवण्याचा कठोर संदेश काँग्रेस नेतृत्वाने दिला पाहिजे. कॅप्टन आणि सिद्धू हे दोघेही एकमेकांच्या समर्थकांना तिकीट मिळणार नाही, याचे प्रयत्न करतीलच. त्यामुळे दोघांच्या भांडणामुळे कोणत्याही आमदाराचे नुकसान होऊ नये याकडेही लक्ष दिले पाहिजे. या वेळी नवज्योत सिंह सिद्धू यांच्यावर पक्षनेतृत्वाने लगाम लावला पाहिजे. त्यांच्या सल्लागारांमुळेच नवा वाद निर्माण झाला आहे. सिद्धू यांच्या सल्लागारांविरुद्ध कारवाई केली जाईल, असे संकेत काँग्रेस सरचिटणीस आणि प्रदेश प्रभारी हरिश रावत यांनी दिले आहेत. परंतु पक्षाने याबाबत लवकर निर्णय घ्यायाला हवा, असे कार्यकर्ते सांगत आहेत.