पाटणा (बिहार)- घडलेल्या गुन्ह्यांच्या गंभीरतेवरून न्यायालय आरोपीला शिक्षा सुनावते. अनेक गंभीर प्रकरणात न्यायालयाकडून कठोरातील कठोर शिक्षा सुनावली जाते. तर गंभीर नसलेल्या आणि आरोपीमध्ये सुधारणा शक्य असल्याचे सिद्ध झालेल्या गुन्ह्यांमध्ये समज देऊन सोडले जाते किंवा कमी कठोर शिक्षा सुनावली जाते. बिहारमध्ये जिल्हा न्यायालयाने असाच एक निर्णय सुनावला आहे.
बिहारमधील मधुमनी जिल्हा दंडाधिकार्यांनी महिलांशी छेडछाड केल्याप्रकरणी आरोपीला गावातील सर्व महिलांचे कपडे मोफत धुण्यासह इस्त्री करून देण्याचे आदेश दिले आहेत. अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी अविनाश कुमार यांनी आरोपी ललन कुमार साफी याला जामीन देताना हा आदेश दिला.
आरोपी ललन कुमार या वर्षी एप्रिलपासून कारागृहात होता. आरोपी कपडे धुण्याचे काम करतो आणि त्याला समाजसेवा करण्याची इच्छा आहे, असे आरोपीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. तक्रारकर्त्याला वाद मिटविण्याची इच्छा असून, त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे, असे याचिकाकर्त्याच्या वकिलांनी सांगितले. आरोपी फक्त वीस वर्षांचा आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी पूर्ण केला आहे. आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. तसेच दोन्ही वादी आणि प्रतिवाद्यांनी प्रकरण मिटविण्याची याचिकाही दिली आहे, असे आरोपीच्या वकिलांनी सांगितले.
सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय सुनावला. त्यानुसार, आरोपीला त्याच्या व्यवसायाशी निगडित सेवांसह सशर्त जामीन मंजूर केला आहे. गावातील सर्व महिलांचे कपडे सहा महिने मोफत धुण्यासह इस्त्री करून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तसेच दहा हजार रुपयांचे दोन जामीनदार देण्यासह जामिनाची प्रत ग्रामपंचायतीच्या सरपंचांना पाठविण्याचे आदेश दिले आहेत.