पुणे – पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना आढावा बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील ११ जिल्हे वगळता कोरोना निर्बंधांमध्ये शिथीलता राज्य सरकारने दिली आहे. मात्र, पुणे शहराला दिलासा द्यावा, अशी मागणी पुण्यातून होत होती. त्याची दखल घेत उपमुख्यमंत्र्यांनी दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकांच्या क्षेत्रात कोरोना बाधितांचा दर (पॉझिटिव्हिटी रेट) साडेतीन टक्के आहे. पुणे शहरात कोरोना निर्बंधांमध्ये शिथीलता देण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. त्यांनी अनुकुलता दर्शविली आहे. जर पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील पॉझिटिव्हीटी रेट ७ टक्क्यांच्या वर गेल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात येतील, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोना निर्बंधांमध्ये शिथीलता देण्यात येत असली तरी कोरोनाचे सर्व नियम पाळणे आवश्यक आहे, असे पवार यांनी बजावले आहे. पवार यांनी केलेल्या घोषणेनुसार, पुण्यातील सर्व दुकाने आता सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरु राहतील. हॉटेल रात्री १० पर्यंत सुरू राहणार आहेत. शनिवार आणि रविवार सर्व सेवा दुपारी ४ पर्यंत सुरू राहतील. मॉल्स आणि शो रुम्स रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहतील. कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींना तेथे प्रवेश असेल, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.