पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर आता पदवीपूर्व स्तरावरील पहिल्या वर्षाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), कौन्सिल ऑफ इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनकडून (आयसीएसई) अद्याप बारावीच्या परीक्षांचे नाकाल जाहीर होणे बाकी आहे. त्यामुळे या दोन्ही मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत दहा टक्के जागा राखीव ठेवण्याचा तसेच गरज वाटली तर महाविद्यालयांना दहा टक्क्यांपर्यंत जागा वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरवर्षी सीबीएसई, आयसीएसईचे निकाल राज्य मंडळाचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच लागतात. यंदा मात्र सीबीएसई, आयसीएसईने मूल्यमापन पद्धतीमध्ये बदल केले होते. त्यामुळे दोन्ही मंडळांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. तसेच निकाल कधीपर्यंत जाहीर होणार या बाबत काही स्पष्टताही देण्यात आलेली नाही. या सगळ्याचा विचार करता राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरु करुन इतर मंडळांच्या विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वेगवेगळ्या वेळी मंडळांचे निकाल लागत असल्याने प्रवेश प्रक्रिया कशी राबवावी याविषयी संभ्रम निर्माण झाला होता. हा राखीव जागांमुळे काही प्रमाणात तोडगा निघू शकला आहे.
विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे यांनी या राखीव जागांविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांचा प्रवेश प्रक्रियेचा आढावा घेतल्यास त्यात सीबीएसई, आयसीएसई आदी मंडळांच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण दहा टक्क्यांच्या आसपास आहे. तसेच काही विद्यार्थी स्वायत्त महाविद्यालयांमध्येही प्रवेश घेतात. हे लक्षात घेऊन विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांतील दहा टक्के जागा या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच गरज वाटल्यास या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या गरजेनुसार दहा टक्क्यांपर्यंत अतिरिक्त जागा महाविद्यालयांच्या मागणीनुसार देण्यास मान्यता दिली जाईल. सीबीएसई, आयसीएसईच्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश प्रक्रियेत संधी मिळण्याची गरज असल्याने हा निर्णय घेण्यात आला.
सीबीएसई, आयसीएसईचा निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर एकत्र गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. त्यामुळे महाविद्यालयाचे शैक्षणिक कामकाज यंदा विलंबाने सुरू होईल, असे सिम्बायोसिस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हृषीकेश सोमण यांनी सांगितले आहे.
Education pune university decision for 10 percent seats reserve fro these students