पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक अध्यक्ष मनोहर ऊर्फ संभाजी भिडे संभाजी भिडे यांच्याविरोधात महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी पुणे शहरातील डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. याअगोदर अमरावती येथे संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महात्मा गांधींच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्यामुळे भिडे यांच्या अडचणी वाढणार आहेत.
अमरावती येथे संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल ही तक्रार आहे. यावेळी तुषार गांधी बरोबर अॅड. असिम सरोदे ही होते. या तक्रारीबाबत अॅड. सरोदे यांनी सांगितले की, तुषार गांधी, विश्वंभर चौधरी, कुमार सप्तर्षी, मेधा पुरव सामंत, अन्वर राजन, संकेत मुनोत, युवराज शहा यांनी संभाजी भिडे आणि कार्यक्रम आयोजन करणाऱ्याविरुध्द ही तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत कलम ४९९ अब्रू नुकसान करणे, अपमान करणे, स्त्रीत्वाचा अपमान करणे, कलम १५३ (अ) समाजामध्ये शत्रुत्व पसरवणे, कलम ५०५ गुन्हेगारी स्वरूपाचा खोडसाळपणा करणे, हे गुन्हे दाखल करण्याची मागणी आम्ही केली आहे. ही तक्रर दिल्यानतंर पोलिसांनी चौकशी करून आम्ही गुन्हा नोंद करू, असे सांगितले.
या तक्रारीबाबत तुषार गांधी यांनी सांगितले की, संभाजी भिंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी आम्ही तक्रारीत केली आहे. संभाजी भिंडे यांनी आमच्या कुटुंबातील महिलांचा अपमान केला आहे. महात्मा गांधी आणि यांच्या आई आणि वडिलांवर त्यांनी टीका केली आहे. आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. संभाजी भिडेवर कारवाई होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी त्यांनी संभाजी भिंडे यांचा बोलविता धनी आरएसएस आणि नागपूर असल्याचा आरोपही केला. त्यांच्यासंदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात एक आणि सभागृहाच्या बाहेर वेगळं बोलतात, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे संभाजी भिडे यांच्याविरोधात राज्यभर आंदोलन करुन त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. त्यात आता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी तक्रार केल्यामुळे संभाजी भिडे यांच्या अडचणी वाढणार आहे.
Pune tushar gandhi Police Sambhaji Bhide Controversial Statement
mahatma gandhi MK Asim Sarode Arrest Demand