पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुण्यासाठी हवेतून चालणाऱ्या स्कायबसची कल्पना आहे. हवेतून चालणारी बस ही पुण्यातील वाहतूक कोंडीवर हा चांगला पर्याय आहे. वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होण्यासाठी हवेतून चालणाऱ्या बस आपण येथे आणणार असून या बसमधून एका वेळेस २५० प्रवाशांन प्रवास करता येणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. यावेळी ते म्हणाले की, पुण्याच्या विकासासाठी चाळीस हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. यामधे दोन- तीन मजली उड्डाणपूल आहेत.
पुणे येथील चांदणी चौकाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, वाढत्या लोकसंख्येबरोबरच पुण्यातील वाहनांची संख्या वाढली आहे. पण, आता पुणेकरांचा प्रवास आजपासून सुसाट होणार आहे, म्हणजे वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होणार आहे. कारण चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं लोकार्पण आज झाल आहे. यावेळी ते म्हणाले की, अनेक अडचणींवर मात करून चांदणी चौकातील रस्त्याचं काम पूर्ण झाले आहे. पुण्यातील रस्त्यांसाठी मेधा कुलकर्णी यांनी अनेक प्रयत्न केले आहेत. चांदणी चौकातील पूल उभारण्यासाठी परदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. मलेशिया, सिंगापूर इथल्या तंत्रज्ञानाचा वापर करून उड्डाण पूल करण्यात आला आहे. पुण्यात ४० हजार कोटींची कामे भविष्यात पूर्ण करणार आहे.
यावेळी त्यांनी मला भारतातून पेट्रोल आणि डिझेल हद्दपार करायचे आहे. त्यासाठी इथेनॉल, मिथेनॉल आणि हायड्रोजन याचा वापर वाढवा. कचऱ्यापासून वीजनिर्मिती करु नका तर कचऱ्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार करा, ग्रीन हायड्रोजन तेच भविष्य असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. या लोकापर्ण सोहळयात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते. तर नाराजी नाट्यानंतर मेधा कुलकर्णी याही व्यासपीठावर होत्या. निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याने मेधा कुलकर्णी या नाराज झाल्या होत्या. मात्र आता त्या कार्यक्रमासाठी आल्या.
मजबूत कनेक्टिव्हिटी
पश्चिम पुण्याचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या चांदणी चौक परिसरातील बहुप्रतीक्षित चांदणी चौक उड्डाणपूल व इंटरचेंज प्रकल्पाचे आज लोकार्पण करण्यात आले. १६.९८ किमी लांबीच्या व ८६५ कोटी रुपये किंमतीच्या या पुलामुळे पुणे शहर व जिल्ह्यातील वाहतूक कोंडीचा मुख्य प्रश्न सुटणार आहे. एकूण १६ किमी लांबीच्या या प्रकल्पांतर्गत २.२ किमी लांबीच्या चांदणी चौक इंटरचेंजचे काम पूर्ण झाले आहे. मुंबई-बंगलोर महामार्गाच्या दोन्ही बाजूंस २-लेन अंतर्गत आणि २-लेन बाह्य सेवेसाठी आहेत. एकाच इंटरचेंजमधून वेगवेगळ्या ८ दिशांना जाण्यासाठी एकूण ८ रॅम्प बनवण्यात आले आहेत, जे विविध भागांना मजबूत कनेक्टिव्हिटी देतील. या संपूर्ण प्रकल्पात एकूण ४ उड्डाणपुल, १ अंडरपासचे रुंदीकरण आणि २ नवीन अंडरपास बांधण्यात आले आहेत. वाहतूकीसाठी संपूर्णपणे तयार असलेल्या या प्रकल्पामुळे चांदणी चौक परिसरात अखंड आणि वाहतूक कोंडीमुक्त रस्त्यांचे जाळे विणले जाईल. शहरातील अत्यंत गजबजलेल्या चौकातील रस्त्यांचा एकात्मिक विकास होईल. उड्डाणपूल आणि सर्व्हिस रस्त्यांमुळे प्रमुख रस्त्यावरील वाहतूक सुरळीत व सुरक्षित होईल.
या प्रकल्पाचे लोकार्पण
राष्ट्रीय महामार्ग ६० वरील खेड-सिन्नर सेक्शनमधील १४ किमी लांबीच्या व ४९५ कोटी रुपए किंमतीच्या खेड-मंचर बायपासच्या चौपदरीकरण प्रकल्पाचे देखील आज लोकार्पण करण्यात आले. या प्रकल्पात ६.६४ किमी लांबीचा सर्व्हिस रोड, एक मुख्य पुल, ९ छोटे पुल, १ उड्डाणपुल, ५ पादचारी अंडरपास, १ व्हेईक्युलर ओव्हरपास, ३ लाईट व्हेईक्युलर अंडरपास, ७ मोठे जंक्शन, १० मायनर जंक्शन तसेच ६ बसस्थानके यांचा समावेश आहे. तसेच खेड आणि मंचर येथील सुरळीत रहदारीसाठी बाह्यवळण रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या रस्ते प्रकल्पामुळे पुणे-नाशिक प्रवासाचा वेळ १.३० तासांनी कमी होईल, ज्यामुळे वेळेची व इंधनाची बचत होईल. पर्यटन तसेच धार्मिक स्थळांना पोहोचणे सुलभ होईल. तसेच खेड व मंचर शहरांना ट्रॅफिक जामपासून मुक्तता मिळेल. कृषी उत्पादन आणि स्थानिक उत्पादनांना मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचणे सुलभ होईल. महाराष्ट्रातील पुणे आणि नाशिक पट्ट्यातील सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक विकासाला चालना मिळेल.
Pune Traffic Solutions Minister Nitin Gadkari
Flying Bus Chandani Chowk