पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जाज्वल्य अभिमानासह पुणे तिथे काय उणे, चा उल्लेख करणाऱ्या पुणेकरांना वाहतुक कोंडीच्या समस्येने मात्र चांगलेच बेजार केले आहे. मुंबईनंतर वाहतुक कोंडी होणारे शहर म्हणून राज्यात पुण्याची ओळख आहे. या समस्येतून पुणेकरांना मुक्त करण्यासाठी महापालिकेने मास्टर प्लान तयार केला आहे. राज्य सरकारच्या आर्थिक मदतीने या आराखड्याची अंमलबजावणी होणार आहे. लवकरच वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळेल, असा विश्वास पुणेकर बाळगूण आहेत.
दाट वस्त्या, संकिर्ण रस्ते असलेल्या जुण्या पुण्यात अगदी गुदमरायला होते. पुणेकरांचा मोठा वेळ प्रवासातच खर्ची होतो. पुण्यातील रस्त्यांवरून वाहन चालवायचे म्हणले तरी अंगावर काटा येतो. पुणेकरांना या समस्येचा सराव झाला आहे. पण, भविष्यात ही समस्या अधिक भयावह ठरू शकते. यामुळे आतापासूनच मार्ग काढणे आवश्यक आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि पालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी एकत्रित दौरा करत काही बैठका घेतल्या होत्या. त्यावर काही सूचना मांडण्यात आल्या होत्या. पुण्यातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी वेळोवेळी झालेल्या बैठकीमधून आता पालिकेने विस्तृत आराखडा तयार केला आहे. राज्या सरकारच्या आर्थिक सहकार्यातून आवश्यक उपाययोजना केल्या जातील.
२१ ठिकाणी उड्डाणपूल
पुणे शहरातील काही ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहे. वारंवार होणारे अपघात आणि वाहतुक कोंडीच्या ठिकाणाचा अभ्यास करण्यात आला असून त्यावर काही उपाय सुचविण्यात आले होते. त्यानुसार शहरात एकूण 21 ठिकाणी उड्डाणपूल, रेल्वे उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर उभारले जाणार असून पालिकेने त्यासाठी खास नवी योजना आखली आहे.
२ हजार कोटींचा निधी
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राज्य सरकारकडून पुणे महापालिकेला दोन हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मिळणार आहे. पुणे महानगर पालिकेचे आयुक्त विक्रम कुमार याबाबत लवकरच प्रकल्प आराखडा सादर करणार असून प्रकल्प कसा आणि कधी पूर्ण होणार याबाबत माहिती देणार आहेत.
Pune Traffic Jam Municipal Corporation Master Plan