पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथे एक दुर्देवी घटना घडली आहे. क्रिकेट खेळत असताना १४ वर्षीय मुलाच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर त्याने तातडीने वडिलांना मोबाइलवर संपर्क साधला. मात्र काही वेळातच हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला. शहरातील वानवडी भागात ही घटना घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
क्रिकेट खेळताना तरुणांचा दुर्दैवी मृत्यू होण्याच्या अनेक घटना घडलेल्या दिसून येतात, मागील वर्षीच पुण्यामध्ये क्रिकेट खेळताना एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर अशाच प्रकारची घटना सांगली मध्ये आणि गुजरात मध्ये देखील घडली होती. आता पुन्हा पुण्यातच अशीच दुर्दैवी घटना घडली आहे.
वेदांत धामणकर (वय १४ वर्षे) हा हाडपसर मधील इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये इयत्ता आठवीत शिकत होता. शाळेला सुट्टी लागल्यामुळे तो मित्रांसोबत गुरुवारी सकाळी क्रिकेट खेळायला गेला होता. खेळत असताना वेदांतने वडिलांना फोन करून छातीत दुखत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी त्याला तत्काळ जवळच्या दवाखान्यात दाखल केले. त्यानंतर त्याला इनामदार हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्या वेळी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पोलिसांनी वेदांतचा मृतदेह वानवडीतील लष्करी रुग्णालयात शवविच्छदेनासाठी पाठविला. त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी शवविच्छेदन अहवालात नमूद केले आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद केल्याचे वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सांगितले.
मागील वर्षी जुन महिन्यात क्रिकेट खेळत असताना २२ वर्षीय तरुणाचा मैदानातच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडली होती. श्रीतेज सचिन घुले (वय २२ वर्ष) असे मृत तरुणाचे नाव होते. श्रीतेज पुण्यातील हडपसर भागात रहात होता. परिसरातील हांडेवाडी मैदानात खेळत असताना श्रीतेजचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटूंबीयांना धक्का बसला होता.
Pune Sports 14 Year Old Boy Death Cricket Playing Heart Attack