पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एसटी महामंडळाच्या शिवशाहीसह विविध बसेस प्रवासात अचानक बंद पडण्याच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. मात्र, यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. आताही असाच एक प्रकार भोर तालुक्यात घडला आहे. मात्र, यावेळी तेथून जाणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे प्रवाशांच्या मदतीला धावल्या.
या घटनेसंदर्भात सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर तालुक्याच्या दाैऱ्यावर जात असताना वाटेत शिवशाही बस बिघाड झाल्याने थांबल्याचे दिसले. गाडी नादुरुस्त झाल्याने प्रवासी पर्यायी वाहनाची वाट पाहत तिथंच उन्हांत थांबले होते. यामध्ये काही लहान मुलांचाही समावेश होता. उन्हाचा तडाखा जाणवत असल्याने हे प्रवासी आणि लहान मुलांना होणारा त्रास कमी करण्यासाठी काही जणांना दुसऱ्या बसमधून खेड शिवापूरमधील टोल नाक्यावर सोडण्याची विनंती केली. तर काही प्रवाशांना माझ्यासोबत असणाऱ्या गाडीतून खेड शिवापूर टोलनाक्यापर्यंत आणले. याठिकाणी त्यांची तात्पुरती व्यवस्था केली.
सुळे पुढे म्हणाल्या की, यातील बरेच प्रवासी सांगली आणि मिरजला जाणारे होते. यावेळी माझ्या सुरक्षेसाठी असणारे पोलीस आणि माझे काही सहकारी यांना प्रवाशांची सोय करण्याबाबत सांगितले. हे सर्वजण प्रवासी त्याच्या गावी जाणाऱ्या बसमध्ये पाठवेपर्यंत थांबतील असा विश्वास दिला. यावेळी प्रवाशांच्या चेहऱ्यावरील आनंद समाधान देणारा होता. तसेच प्रवाशांना टोलनाक्यापर्यंत आणण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल एसटी बसचे चालक एस. एस. कदम आणि वाहक आर. व्ही. सोनवणे यांचे आभार मानले.
खासदार सुळे म्हणाल्या की, एसटी महामंडळाने आपण बाहेर सोडत असणारी प्रत्येक गाडी तपासून पाठविली पाहिजे. महामंडळाच्या गाड्या अचानक नादुरुस्त होण्याचे प्रमाण देखील आजकाल वाढले असल्याचे प्रवासी सांगतात. राज्याच्या परीवहन मंत्री महोदयांनी याकडे वैयक्तिक लक्ष घालून प्रवाशांना नाहक त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://twitter.com/supriya_sule/status/1662437322628157442?t=2tLoKqWcCgJOTtfN5IsyTQ&s=03
Pune Shivsahi Bus MP Supriya Sule Help Passengers