पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर व जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये महिला, मुली आणि तरुणी वरील अत्याचारांच्या मध्ये वाढ झाली आहे. याबद्दल समाजामध्ये चिंता व्यक्त होत आहे. अशाच प्रकारची एक अत्यंत भयानक घटना जिल्ह्यातील शिरुर शहरात घडली. एका परप्रांतीय युवकाने सहा वर्षीय बालिकेवर बलात्कार केल्याचा निंदनीय प्रकार घडला आहे. सदर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना या आरोपीला शिरुर पोलिसांच्या पथकाने काही तासात जेरबंद करत अटक केली. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल कौतुक करण्यात येत आहे.
सायंकाळची घटना
शिरुर शहरात राहणारी एक महिला सायंकाळच्या सुमारास घरात स्वयंपाक करीत होती. त्याचवेळी तिची सहा वर्षांची मुलगी घराबाहेर अंगणात खेळत होती. पाचू हादरा नावाची व्यक्ती तेथे आली. त्याने या चिमुरडीला बाजूच्या खोलीत नेले. तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. यावेळी चिमुरडीच्या ओरडण्याचा आवाज आला. मुलीचा आवाज येत असल्याने आई त्या दिशेने पळाली.
तेथील प्रकार पाहून तिला धक्काच बसला. आपल्या बालिकेवर पाचू हादरा (रा. शिरूर, जि. पुणे) हा अत्याचार करत असल्याचे दिसले. यावेळी बालिकेच्या आईने आरडओरडा केल्याने आरोपी पाचू पळून गेला. चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला कडक शासन करा, वासनांध आणि विकृत मनोवृत्तीच्या नराधमाने अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना अतिशय निंदनीय आहे. हे अमानवी कृत्य करणाऱ्या नराधमाला कठोर शासन करा, अशी मागणी कुटुंबीय आणि महिला संघटनांकडून होत आहे.
पोलिसांची दोन पथके
पिडीत बालिकेच्या आईने शिरुर पोलीस स्टेशन गाठत घडलेला प्रकार सांगत तक्रार दाखल केली. तर घटनेचे गांभीर्य लक्षात पोलिसांनी आरोपी परप्रांतिय असल्याने पळून जाऊ शकतो म्हणून तातडीने पोलिसांचे दोन पथक नेमून अहमदनगर व पुणे रेल्वे स्टेशन येथे रवाना केले. मात्र सदर ठिकाणी आरोपी सापडला नाही. त्यानंतर सकाळच्या सुमारास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस पथकाने शिरुर शहरात शोध मोहीम राबवत पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या पाचू हादरा याला ताब्यात घेत अटक केली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
Pune Shirur Small Girl Rape Crime