पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शासन आपल्या दारी म्हणत राज्य सरकारने विविध गावांमध्ये मांडव टाकला. लाखो लोकांना मदत केल्याचा दावा सरकार करत आहे. अगदी गडचिरोलीपर्यंत सरकार पोहोचले. मात्र बारामती मतदारसंघातील जेजुरीमध्ये ठरलेला दरबार मात्र अद्याप मुहूर्त गाठू शकलेला नाही. सलग तिनदा येथील कार्यक्रम रद्द झाला आहे. या कार्यक्रमावरील लाखोंच्या खर्चाला जबाबदार कोण असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
राज्य सरकार सध्या स्वतःच्याच गुंत्यांमध्ये अडकलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार मंत्रीमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपाच्या तिढ्यामध्ये अडकून पडलेले आहेत. राष्ट्रवादीतून अजित पवार यांच्यासह ९ नेत्यांनी २ जुलैला मंत्रीपदाची शपथ घेतली त्यामुळे ३ जुलैला ठरलेला जेजुरीचा शासन आपल्या दारी कार्यक्रम लांबणीवर पडला. त्यानंतर ८ जुलैला कार्यक्रम ठरविण्यात आला. पण तोपर्यंत खातेवाटप झालेले नसल्यामुळे कमालीची नाराजी होती. परिणामी पुन्हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.
अखेर १३ जुलैचा दिवस ठरला. पण इकडे अद्याप तिढा सुटलेला नसल्यामुळे पुन्हा दरबार रद्द झाला. या सर्व प्रकारात आतापर्यंत जवळपास ४० लाख रुपये खर्च झालेले आहेत. विशेष म्हणजे बारामती मतदारसंघात कार्यक्रम असल्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले होते. येथील मार्तंड देवस्थानाच्या विकास आराखड्यातही भूमीपूजन होणार होते. हेदेखील रद्द झाले.
भव्य सभामंडप टाकण्यात आला, साऊंड सिस्टीम लावण्यात आली. हे सारे होत असताना जेजुरीतील नागरिक मात्र वेगळ्याच कारणाने अस्वस्थ आहेत. कारण दरबार होणार म्हणून सर्व सरकारी अधिकारी व कर्मचारी त्या कामात व्यस्त होते. आणि छोट्या मोठ्या कामांसाठी सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या मारणाऱ्या नागरिकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे.
दरबार अधिवेशनानंतरच?
जेजुरी येथील ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम आता मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतरच होईल, असा अंदाज लावण्यात येत आहे. तर मंत्रीमंडळाचा विस्तार अधिवेशनानंतर होईल, अशीही चर्चा आहे. अशात सरकारचा जनता दरबार आता अधिवेशनानंतरच होईल, असेही बोलले जात आहे.
जबाबदार कोण
शासन आपल्या दारी या कार्यक्रमावर लाखोंचा खर्च केला जात आहे. आता या कार्यक्रमाला राजकीय शक्तीप्रदर्शन आणि इव्हेंटचेही स्वरुप आले आहे. शिवाय गर्दी जमविण्यासाठी प्रशासनाला चांगलेच कामाला लावले जात आहे. सलग तीन वेळा लाखोंचा करण्यात आलेला खर्च वाया गेला आहे. या सर्व प्रकाराला कोण जबाबदार आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे