पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोविडमध्ये संपूर्ण भारतच नव्हे जगभरातील विविध देशातील नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या सीरम इन्स्टिट्युटने आता डेंग्यू, मलेरियावर लस निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोविडदरम्यान सीरम इन्स्टिट्युने लस निर्माण करून अनेकांचे प्राण वाचविले. त्यावेळी सीरम इन्स्टिट्युट हे नाव कानाकोपऱ्यात पोहचले. त्या इन्स्टिट्युटने आता डेंग्यू आणि मलेरिया यांसारख्या जीवघेण्या आजारावर लस तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात सध्या डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण वाढत आहेत. मात्र यावर कोणताही रामबाण उपाय नाही. त्यामुळे अनेकदा नागरिकांची तब्येत खालावते परिणामी मृत्यूदेखील होतो. हीच बाब लक्षात घेत आता सीरम इन्स्टिट्यूट डेंग्यू आणि मलेरियावर लस बाजारात आणणार आहे.
येत्या वर्षभरात डेंग्यूवरची लस बाजारात उपलब्ध होणार आहे तर मलेरियावरची लस बाजारात येण्यासाठी काही काळ वाट बघावी लागणार आहे. ‘कोविड लशीच्या यशानंतर आम्ही डेंग्यू आणि मलेरियावर लस बनवणार आहे. या लसीची नितांत गरज आहे. आफ्रिक देशात आणि भारतात डेंग्यू आणि मलेरियाची साथ कायम येते. यावर उपाय आहेत मात्र ठोस अशी लस नाही त्यामुळे आम्ही ही लस तयार करणार आहोत,’ असे सीरम इन्स्टिट्युटचे व्यवस्थापक संचालक सायरस पुनावाला यांनी म्हटले आहे.
शरद पवारांनी आता निवृत्त व्हावे
शरद पवारांकडे दोनदा पंतप्रधान होण्याची संधी होती, पण त्यांनी त्या संधी गमावल्या. ते अत्यंत हुशार व्यक्तिमत्व आहेत. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान म्हणून देशाची चांगली सेवा केली असती. पंरतु त्यांच्या हातातून संधी निघून गेली. आता जसं माझं वय वाढतंय तसचं त्यांचही वाढतंय, त्यामुळे त्यांनी आता निवृत्त व्हावे, असे सायरस पूनावाला म्हणाले आहे. शरद पवार आणि सायरस पुनावाला यांची मैत्री सर्वांच्या परिचयाची आहे. त्यातच सायरस पुनावाला हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी देखील ओळखले जातात. त्यामुळे त्यांनी दिलेला हा सल्ला शरद पवार किती गांभीर्याने घेतात हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
Pune Serum Institute Dengue Malaria Vaccination
Cyrus Poonawala