पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सर्व शाळांमध्ये आज मोठ्या उत्साहात प्रवेशोत्सव साजरा होत असताना पुण्यात संतापजनक प्रकार घडला आहे. पुण्यातील राजगुरुनगर येथे शैक्षणिक शुल्क न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारात कडक उन्हात फरशीवर बसविण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी हा प्रकार झाल्याने शाळा व्यवस्थापनाच्या विराेधात पालक आक्रमक झाले आहेत. हा प्रकार घडल्यानंतर पालकांनी संताप व्यक्त केला. तसेच, या प्रकाराची आता राज्यभरात चर्चा होत आहे.
निषेध आंदोलन
राज्यभरातील शाळांत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले जात आहे तर दुसरीकडे पुण्याच्या राजगुरुनगर येथील शेठ केशरचंद पारख या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना थेट बाहेरचा रस्ता दाखविला. यामुळे बिचारी मुले कडक उन्हात शाळेच्या व्हरांड्यातील फरशीवर बसली. शाळेचा पहिला दिवस मुलांसाठी आनंदाचा दिवस असताना त्यांना त्रास सहन करावा लागला. विद्यार्थ्यांनी फी भरली नाही म्हणून वर्गा बाहेर बसवले आहे असे विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी सांगितले. शाळेच्या या गैरकृत्याचा तथा क्रुर धोरणाबद्दल संताप व्यक्त होत आहे. शाळेच्या या कृत्यामुळे मनसेचे पदाधिकाऱ्यांनी शाळा प्रशासनाला जाब विचारला, मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने उद्या शेठ केशरचंद पारख इंग्लिश मिडियम स्कूलचा समोर निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
काय कारवाई होणार
शाळेच्या पहिल्या दिवशी हा प्रकार घडल्याने याची दखल शिक्षण विभाग घेणार का आणि शाळा व्यवस्थापनावर कारवाई होणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. शिक्षण विभागाने हा प्रकार गांभिर्याने घ्यावा खासकरुन शिक्षण आयुक्त पुण्यातच असतात. आणि हा प्रकार घडल्याने त्यांनी कारवाईचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली जात आहे.