पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील सदाशिव पेठेत तरुणीवर झालेल्या हल्ल्याने राज्य हादरले होते. आता या हल्लेखोराला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याची
पोलिसांनी चौकशी केली असता तरुणीने प्रेमसंबंध संपवल्याच्या रागातून हल्ला केल्याचा जबाब हल्लेखोराने दिला आहे. त्यामुळे सर्व स्तरावरुन आता संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, याप्रकरणात तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
कर्तव्यात कसूर
सदाशिव पेठेत महाविद्यालयीन तरुणीवर एका तरुणाने कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. भररस्त्यात घडलेल्या या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरवून गेला होता. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. या हल्लेखोराचे नाव शंतनू जाधव ( वय २१ ) असून त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी दोन तरुणांनी आरोपीला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले होते. अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते त्यावेळी त्याने हा जबाब नोंदवला आहे. दरम्यान, उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी विश्रामबाग पोलीस ठाणे अंतर्गत पेरूगेट चौकीतील पोलिस हवालदारासह तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. या तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात हायगय केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.पोलीस हवालदार सुनील शांताराम ताठे, पोलीस कर्मचारी प्रशांत प्रकाश जगदाळे आणि सागर नामदेव राणे अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. याबाबतचे आदेश काल जारी करण्यात आले आहेत.
डोक्यावर व हातावर कोयत्याने वार
सध्या या घटनेमुळे पुण्यातील तरुणी व महिला यांची सुरक्षितता धोक्यात आल्याचे म्हटले जात आहे. कारण सदाशिव पेठेत मंगळवारी सकाळी एका तरुणाने महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करून तिच्या डोक्यावर आणि हातावर कोयत्याने वार करून जखमी केले होते. तसेच, या तरुणीसमवेत असलेल्या मित्रावर कोयत्याने वार करून हाताच्या अंगठ्याला दुखापत केली होती. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी शंतनू या आरोपीला अटक केली. परंतु पेरूगेट पोलrस चौकीच्या हाकेच्या अंतरावर हा सर्व थरार सुरू असताना चौकीतील हे तीन पोलिस कर्मचारी गैरहजर होते. त्यामुळे त्यांचे चौकशी करण्यात आली असता कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी या तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त गिल यांनी दिली आहे.