पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील रस्ते अपघातात महिलेच्या मृत्यू प्रकरणी न्यायालयाने कार चालकाला शिक्षा सुनावली आहे. पंजाब नॅशनल बँकेमध्ये अरुंधती हसबनीस नोकरी करत होत्या. एके दिवशी अरुंधती दुचाकीवरून जात असताना त्या दुचाकीला कारने जोरात धडक देत महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले कॉसमॉस बँकेचे मानद अध्यक्ष डॉ. मुकुंद अभ्यंकर यांना न्यायालयाने ६ महिने तुरुंगवास आणि १२०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. के. दुगावकर यांनी हा निकाल दिला आहे.
पळून जात होते, नागरिकांनी पकडले
पुण्यातील भांडारकर रोडवर जुलै २०१८ मध्ये झालेल्या या अपघातात अरुंधती हसबनीस (वय २९) यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी विक्रम सुशील धूत (३५, रा. शिवाजीनगर) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. अरुंधती या दुपारी दुचाकीवरून भांडारकर रोडवरून मैत्रिणीकडे निघाल्या होत्या. लॉ कॉलेज रस्त्याकडून गुडलक हॉटेलच्या दिशेने जात असताना अभ्यंकर यांच्या कारने धडक त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघात त्यांचा मृत्यू झाला होता.
अपघातानंतर अभ्यंकर घटनास्थळावरून पळून जात होते, परंतु नागरिकांनी त्यांना पकडून पोलिसाच्या ताब्यात दिले. या खटल्यामध्ये एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील गिरीश बारगजे यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले. सरकारी वकिलांना फिर्यादीतर्फे ॲड. सूर्यकुमार निरगुडकर, ॲड. ऋग्वेद निरगुडकर आणि ॲड. शशांक वकील यांनी मदत केली.
विविध कलमांनुसार शिक्षा
भारतीय दंड संहितेच्या कलमानुसार बेदरकारपणे वाहन चालवणे, मृत्यूस कारणीभूत ठरणे, मोटार वाहन कायद्याचे कलम विशिष्ट प्रकरण मोटार उभी करून चालकाने घटनास्थळी थांबणे आणि अपघातास कारणीभूत झालेल्या वाहनचालकाने जखमींना ताबडतोब वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जाणे तसेच जवळच्या पोलिस ठाण्यास त्वरित खबर देणे यासारख्या विविध कलमांनुसार ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास एक महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे आदेशात नमूद केले आहे.
डॉ. अभ्यंकर यांचे वकील ऋषिकेश गाणू यांनी म्हटले आहे की, शिक्षेच्या विरोधात आम्ही सत्र न्यायालयात अपील करणार आहोत. त्यासाठी काही कालावधी लागणार आहे. या निकालाच्या अंमलबजावणीला स्थगिती मिळावी यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. तो न्यायालयाने मंजूर केला आहे.
Pune Road Accident Women Death Court Sentence