इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. शिरुर तालुक्यातील गुनाट गावातून त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला पुणे न्यायालयात हजर करण्यात आले. या आरोपीसोबत आणखी साथीदार आहेत का याचा तपास करायचा आहे. तसेच या प्रकरणातील आरोपीचा मोबाईल हस्तगत करायचा असून त्याला पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
मंगळवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास २६ वर्षीय तरुणीवर गाडेने बलात्कार केला होता. ही घटना स्वारगेट बसस्थानकात घडली होती. त्यानंतर तो पळून गेला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला शोध सुरु केला. गाडे गावातच लपल्याचं लोकेशन ट्रेस झाल्यानंतर गावात १०० पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता. डॉग स्क्वायड आणि ड्रोनच्या मदतीने त्याचा शोध घेण्यात आला. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या १३ टीम तयार केल्या होत्या. रात्री बाराच्या सुमारास तो नातेवाईकाच्या घरी जेवायला गेला होता. प्रचंड भूक लागलीय, काही तरी खायला द्या असे त्याने सांगितले. पण, नातेवाईकांनी खायला न देता पाण्याची बाटली दिली. त्याचवेळी गाडे याने पश्चाताप झालाय, जे काही केले ते चुकीचं आहे. पोलिसांना सरेंडर व्हायचंय असं सांगितले. त्यानंतर तो बाटली घेऊन निघून गेला. यानंतर नातेवाईकांनी पोलिसांना गाडेची माहिती दिली.
गाडे याच्यावर यापूर्वी चोरी, दरोडा, चेन स्नॅचिंग यांसारखे गुन्हे दाखल आहेत. २०१९ मध्ये एका गुन्ह्यात आरोपीची जामिनावर सुटका झाली होती. आरोपी गेल्या दोन दिवसांपासून फरार होता. याप्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपींची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते.