पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान विचारात घेता राजगुरूनगर येथे निर्माण होणारे स्मारक देशातील नागरिकांसाठी ऊर्जा केंद्र व्हावे; या स्मारकासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
राजगुरुनगर येथे हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या स्मारकाच्या कामाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार दिलीप मोहिते-पाटील, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, पुणे पाटबंधारे मंडळाच्या अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप आदी उपस्थित होते.
श्री. मुनगंटीवार म्हणाले, हुतात्मा राजगुरू यांच्या अंगी प्रचंड राष्ट्रभक्ती होती, त्यांनी देशासाठी प्रचंड त्रास सहन केले. असा महान पुरुष आपल्या मातीत जन्माला आला याचा आपल्याला अभिमान आहे. हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मस्थळाचा विकास करताना तिथल्या प्रत्येक खांबातून, विटेमधून आणि भिंतीतून स्वातंत्र्य लढ्यातील इतिहासाची अनुभूती देणारे स्मारक उभारणे गरजेचे आहे. स्मारक करताना सुयोग्य नियोजन करुन गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, शास्त्रशुद्ध काम व्हावे, तसेच तांत्रिकदृष्ट्या सर्व बाबी तपासून वेळेत काम पूर्ण झाले पाहिजे. येथे डिजिटल ग्रंथालय तयार करुन त्याला विषयानुसार क्यूआर कोड देण्याची व्यवस्था करावी.
स्मारकाला भेट देणाऱ्या नागरिकांच्या अंगी राष्ट्रभक्तीचा भाव निर्माण झाला पाहिजे. शहिदाचे गाव असल्याची जाणीव झाली पाहिजे, यासाठी स्थानिक सार्वजनिक इमारतीच्या भिंतीवर देशभक्तीपर घोषवाक्ये प्रदर्शित करणे, बसस्थानकाचे संकल्पचित्र जे. जे. आर्ट स्कूलकडून तयार करणे, शहरातील रस्त्याचे सुशोभीकरण करणे, पर्यटकांचे निवासस्थान, गर्दीचा विचार करता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आदी कामांचे नियोजनात समावेश करण्याबाबत विचार करावा. यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती, नागरिकाची मदत घ्यावी. नागरिकांची मते, कल्पनांचा यामध्ये समावेश करण्यासाठी एक संकेतस्थळ तयार करावे. प्रशासन, सामाजिक संघटना, येथील नागरिकांनी मिळून हुतात्मा राजगुरु यांच्या जन्मस्थळाचा विकास करण्यासाठी काम करण्याचे आवाहन श्री.मुनगंटीवार यांनी केले.
आमदार श्री. मोहिते पाटील म्हणाले, हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकाचे काम प्राधान्याने वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्याची गरज आहे. स्थानिक नागरिकांना प्रशासनाने विश्वासात घेऊन काम करावे, असेही ते म्हणाले.
विभागीय आयुक्त श्री. राव म्हणाले, हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकाचा आढावा घेण्यासाठी आतापर्यंत एकूण सहा बैठका घेण्यात आल्या आहेत. या बैठकीत केलेल्या सर्वंकष सूचनांचा या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि जुन्या अभिलेखांचा संगम साधून हुतात्मा राजगुरू यांच्या विषयीची माहिती भावी पिढीपर्यंत सोप्या भाषेत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, असेही श्री. राव म्हणाले.
यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, स्मारक समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख यांच्या समवेत नागरिकांनी सूचना केल्या. या सूचनांचा स्मारक आराखड्यात समावेश करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल असेही, मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.
हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकाबाबत समग्र विकास आराखडा पुरातत्व विभागाच्यावतीने तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने परिसर विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले.
बैठकीपूर्वी मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकाची आणि थोरलेवाड्याची पाहणी केली.
यावेळी राजगुरूंचे वंशज सत्यशील राजगुरू, हर्षवर्धन राजगुरू, प्रशांत राजगुरू, उप विभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे, तहसीलदार वैशाली वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, न.प. चे मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे आदी उपस्थित होते.