पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पुणे ही ऐतिहासिक आणि औद्योगिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण नगरी असून, येथील रेल्वे स्थानकाचा सर्वांगीण कायापालट करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या अंतर्गत चार नवीन फलाटांची उभारणी आणि जागतिक दर्जाची डिजिटल यंत्रणा स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज येथे दिली.
हडपसर येथून सुरू होणाऱ्या हडपसर–जोधपूर एक्सप्रेस व एमजीआर चेन्नई सेंट्रल–भगत की कोठी एक्सप्रेस गाड्यांचे उद्घाटन आज वैष्णव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे आणि मेधा कुलकर्णी उपस्थित होते. तसेच माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन (चेन्नईहून) आणि गजेंद्रसिंह शेखावत (जोधपूरहून) दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
वैष्णव यांनी सांगितले की, पुणे, हडपसर, खडकी, शिवाजीनगर, उरळी कांचन आणि आळंदी या सहा स्थानकांचा विकास आराखडा अंतिम टप्प्यात आहे. पुणे–नागपूर वंदे भारत रेल्वे सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी नमूद केले. पुणे–नाशिक मार्गावर देखील नवीन ट्रॅकच्या चाचण्या सुरू असून, खोडद येथील जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळेमुळे या मार्गाला प्राधान्य दिले जात आहे. पुणे–लोणावळा मार्गावर तिसऱ्या व चौथ्या ट्रॅकचे काम लवकरच पूर्ण होईल.
मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, हडपसर–जोधपूर एक्सप्रेसमुळे पुण्यातील राजस्थानी समुदायाला मोठा लाभ होणार आहे. राज्यात रेल्वे विभागाची एक कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर आहेत. अमृत भारत योजनेअंतर्गत पुणे, हडपसर, उरळी आणि शिवाजीनगर स्थानकांचा विकास सुरू आहे.
खासदार मेधा कुलकर्णी यांनी कुंभमेळा लक्षात घेता पुणे–नाशिक दरम्यान नवीन रेल्वे सुरू करण्याची मागणी केली.
हडपसर–जोधपूर एक्सप्रेस वेळापत्रक:
५ मे २०२५ पासून ही गाडी नियमित सुरू होईल.
हडपसर – प्रस्थान: संध्या. ७.१५ वाजता | जोधपूर – आगमन: दुसऱ्या दिवशी दुपारी ३.००
जोधपूर – प्रस्थान: रात्री १०.०० | हडपसर – आगमन: दुसऱ्या दिवशी संध्या. ५.००
थांबे: चिंचवड, लोणावळा, कल्याण, वसई रोड, वापी, सुरत, वडोदरा, अहमदाबाद, महेसाणा, पालनपूर, आबू रोड, पिण्डवाडा, जवाई बाँध, फालना, राणी, मारवाड जंक्शन, पाली मारवाड, लूनी