पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रेल्वेचा प्रवास हा सुखकर म्हटला जातो, कारण एकतर प्रवास भाडे कमी असते, तसेच रेल्वेमध्ये चांगल्या सोयी सुविधा देखील मिळतात, परंतु रेल्वेचा प्रवासात जेवढी रेल्वेच्या आतमध्ये गर्दी असते तेवढीच प्लॅटफॉर्मवरही असते. या शिवाय रेल्वे जर ठराविक वेळेपेक्षा उशिरा येणार असेल तर अनेकजण प्लॅटफॉर्मवरती झोपतात. प्रवासी प्लॅटफॉर्मवर झोपल्यामुळे इतर प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय होते, याबाबत कोणाचेच दुमत नाही. पण झोपलेल्या प्रवाशांना उठवण्याची, त्यांना जागे करण्याची काही पद्धत असते. मात्र पोलिसाने झोपलेल्या लोकांवर चक्क पाणी ओतले. पुणे रेल्वे स्थानकातील एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो प्रकार पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
अनेकांना बसला धक्का…
पुणे रेल्वे स्थानकावर प्रवासी झोपलेले असताना हा भयानक प्रकार घडला, यासंदर्भात व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यांने प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या लोकांना अशा पद्धतीने जागे करण्याचा प्रयत्न केला आहे, तो प्रकार बघून अनेकांना धक्का बसला. कारण व्हिडीओमध्ये प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या काही लोकांच्या अंगावर एक पोलीस बाटलीतील पाणी ओतताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ रूपेन चौधरी नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक रेल्वे पोलिस कर्मचारी प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या लोकांवर पाणी ओतताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना ट्विटर वापरकर्त्याने कॅप्शनमध्ये, “RIP माणुसकी. पुणे रेल्वे स्टेशन,” असे लिहिले आहे.
रेल्वे व्यवस्थापक म्हणाले…
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तर काहींनी हे अत्यंत निंदनीय कृत्य असल्याचे म्हटले आहे. पुण्याच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम), इंदू दुबे यांनीदेखील या प्रकरणावर भाष्य केले आहे, त्यांनी ही घटना अत्यंत खेदजनक असल्याचे म्हटले आहे. शिवाय प्लॅटफॉर्मवर झोपल्याने इतर प्रवाशांची गैरसोय होते हे मान्य आहे, परंतु ज्या पद्धतीने लोकांना झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला आहे, ते योग्य नसून संबंधित कर्मचार्यांना प्रवाशांशी सन्मानाने, आणि सभ्यतेने वागण्याचा सल्ला दिला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. एका ट्विटर वापरकर्त्याने थेट रेल्वे मंत्र्याना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपण्याची परवानगी आहे का? असा प्रश्न विचारत पोलीस कर्मचाऱ्याच्या कृतीचे समर्थनदेखील केले आहे.