पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांची भेट घेतल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. जयंत पाटील हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. आता यासंदर्भात खुद्द जयंत पाटील यांनीच खुलासा केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसाच्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी जयंत पाटील यांनी सकाळच्या सुमारास अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. विशेष म्हणजे या भेटीवेळी ज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते, असे बोलले जात आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी झाली आहे. पवार यांनी उपमुख्यमंत्री तर अन्य ८ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या घडामोडींनंतर जयंत पाटील हे शरद पवार यांच्यासोबत आहेत. मात्र, पाटील यांना आपल्या गटात घेण्यासाठी अजित पवार यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, शाह यांच्या भेटीच्या चर्चेवर जयंत पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे. जयंत पाटील यांनी या चर्चांचे खंडन केले आहे. माझ्याबाबतच्या चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. मी कुणालाही भेटलो नाही. कुणाशीही माझा संपर्क झालेला नाही. अशा बातम्या पेरून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. मी कुठेही जाणार नाही. मी शेवटपर्यंत शरद पवार यांच्यासोबतच राहणार आहे, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
pune politics ncp jayant patil meet amit shah