पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निवडणुका जवळ आल्या की पक्षबदलीचे वारे वाहतात. साधी महानगरपालिकेची निवडणुक असो वा लोकसभेची… इकडचे नेते तिकडे जाताना दिसतात. आता पुण्यात महाविकास आघाडीला खिंडार पडणार असल्याचा दावा पुणे भाजपचे शहराध्यक्ष जगदिश मुळिक यांनी केला आहे. महानगरपालिकेत महाविकास आघाडीकडे नगरसेवक उरणार नाहीत, असाच दावा त्यांनी अप्रत्यक्षरित्या केला आहे.
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका व्हायच्या आहेत. सध्या महानगरपालिका प्रशासनाच्या म्हणजे आयुक्तांच्या ताब्यात आहे. येत्या काळात पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका होतील. त्यामुळे मुळिक यांचा दावा खरा ठरला तर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे. आपल्या मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी नगरसेवकांना राज्य शासनाकडेच पाठपुरावा करावा लागतो. पण आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार नाही. आणि प्रत्येक कामासाठी जर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच गरज भासत असेल तर महाविकास आघाडीत राहून काय उपयोग. त्यामुळे महाविकास आघाडीतील १७ नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा जगदिश मुळिक यांनी केला आहे. असे झाल्यास महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का असणार आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावला आहे. अशात महानगरपालिका ताब्यात घेण्याचे मनसुबेही वाढलेले आहेत. पण आघाडीला खिंडार पडली तर निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागू शकते. अर्थात मुळिक यांचा दावा खरा ठरला तरच ही शक्यता आहे, हेही तेवढेच खरे.
मविआच्या हाती काहीच नाही
महाविकास आघाडी सत्तेत नसल्यामुळे त्यांच्या हाती काहीच नाही. प्रत्येक कामासाठी भाजपवरच अवलंबुन राहावे लागते. त्यामुळे महाविकास आघाडीचे नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जगदिश मुळिक म्हणाले.
पराभवाची भिती नाही
कसबा पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाची भिती नाही, असे जगदिश मुळिक यांनी स्पष्ट केले आहे. पोटनिवडणुकीच्या नियोजनाच्या बैठकीत कुणाल आणि शैलेश टिळक यांनी सहभाग घेतला आणि भाजपला पाठिंबा दिला आहे. हेमंत रासने यांनी अर्ज भरला तेव्हा वैय्यक्तिक कारणांनी ते येऊ शकले नव्हते. त्याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही, असेही जगदिश मुळिक म्हणाले. निवडणुक बिनविरोध व्हावी, यासाठी आमचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.
Pune Politics Mahavikas Aghadi 17 Corporators Will Left Soon
BJP